सातारा जिल्हा बँक : चुका झाल्या की काय होते हे जिल्हा बँकेत बघितले | पुढारी

सातारा जिल्हा बँक : चुका झाल्या की काय होते हे जिल्हा बँकेत बघितले

सातारा : पुढारी वृत्तसेवा; काहींना न पटणार्‍या गोष्टी जिल्हा बँकेवेळी झाल्या असतील. परंतु, जुन्या गोष्टी उकरून न काढता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मागे लागूया. काही चुका झाल्या की काय होवू शकते हे आपण जिल्हा बँक निवडणुकीवेळी बघितलं आहे. माण व कोरेगावची जागा चिठ्ठीपर्यंत गेली. जावलीतील जागा एका मताने पराभूत झाली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत त्यातून काही अनूचित प्रकार घडले. याचे आत्मपरिक्षण करा व चुका दुरूस्त करून वाटचाल करा, अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ना. अजितदादा पवार यांनी पक्षातील नेत्यांना कानपिचक्या दिल्या.

सातार्‍यातील राष्ट्रवादी भवनाच्या नूतनीकरण केलेल्या इमारतीचे उद्घाटन झाल्यानंतर आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी सहकारमंत्री ना. बाळासाहेब पाटील, खा. श्रीनिवास पाटील, आ. मकरंद पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. दीपक चव्हाण, जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन पाटील, जि.प. अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदिप विधाते, सत्याजितसिंह पाटणकर, जिल्हाध्यक्ष सुनील माने, प्रभाकर देशमुख, बाळासाहेब सोळस्कर, मंगेश धुमाळ, सोनाली पोळ, समिंद्रा जाधव, स्मिता देशमुख, सुभाष शिंदे, मनोज पोळ, सुरेंद्र गुदगे, राजकुमार पाटील, शहाजी क्षीरसागर, संदीप मांडवे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ना. अजित पवार www.pudhari.news
राष्ट्रवादी भवनाच्या नुतनीकरण केलेल्या इमारतीचे उद्घाटन करताना ना. अजित पवार व मान्यवर.

पक्षाला पाठिंबा व प्रेम देणारा सातारा-ना. अजित पवार

ना. अजित पवार म्हणाले, राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर पक्षाला पाठिंबा व प्रेम देणारा सातारा जिल्हा होता. पक्षाची स्थापना झाल्यानंतर 2002 पासून सातारा व पुणे जिल्हा परिषद राष्ट्रवादीच्या एकतर्फी ताब्यात राहिल्या आहेत. कालांतराने चित्र बदलत गेले आहे.जोपर्यंत आपल्याकडे पदे आहेत तोपर्यंत त्या पदाला बांधिल राहून जनतेला फायदा करून द्यावा. जिल्ह्यातील विविध इमारती व रस्ते कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. महाविकास आघाडीला दोन वर्षे पूर्ण झाली असून आणखी तीन वर्षे सरकार टिकवण्यासाठी महाविकास आघाडी मजबूत बनवण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे.

पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या भागातील ज्या काही गोष्टी असतील तर त्या आमदार व पालकमंत्र्यांना सांगाव्यात. त्याच्यावर प्रत्यक्ष कृती करून सोडवल्या जातील. ना. बाळासाहेब पाटील यांनी राष्ट्रवादी भवनाच्या इमारतीमध्ये पुढाकार घेवून जे योगदान दिले त्याबद्दल त्यांचेही कौतुक आहे. ज्या पक्षाने मंत्रीपद दिले, आमदारकी दिली व मोठे केले त्याच्याशी बांधिलकी जपण्याचे काम बाळासाहेबांनी केले आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी चांगल्या पध्दतीने पार पाडावी. या कार्यालयात बसून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जनतेचे प्रश्‍न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तालुका पातळीवरही अशी कार्यालये उभारण्यासाठी जि.प. पदाधिकार्‍यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे, असेही ना. अजितदादा म्हणाले.

महाविकास आघाडीमध्ये 170 आमदार असून त्यांच्या कलानुसार चालायचे असे ठरवले आहे.पण त्यातील काही लोकप्रतिनिधी सर्वांना सोबत घेवून जाण्याचा प्रयत्न करत नसतील तर अडचणी येत आहेत. त्यामुळे आमचेही सहकारी व पदाधिकारी भरडले जात आहेत आम्हालाही वेदना होत आहेत. हे सर्व दूर करायचे असेल तर आपल्याला आपल्या पक्षाची ताकद वाढवावी लागणार आहे, असेही ते म्हणाले.

अजितदादांकडून राजकुमार पाटलांचे कौतुक

राष्ट्रवादी भवनाच्या नूतनीकरणाचे काम पाहून अजितदादांनी जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांचे जाहीर कौतुक केले. व्यासपीठावर त्यांचा सत्कारही केला. राजकुमार पाटील यांना उद्देशून जाहीर भाषणात अजितदादा म्हणाले, राष्ट्रवादी भवनाच्या इमारतीमध्ये प्रवेश केल्यानंतर एखादी चूक सापडते का? हे मी पाहत होतो. मात्र मला कोणतीही चूक आढळून आली नाही. यामध्ये राजूआबा तुमचे कौतुक आहे. सातार्‍याच्या भवनातील बदल बारामतीच्या कार्यालयात करता येईल का? यासाठी मी स्वीय सहाय्यकांना कार्यालयातील सर्व फोटो घेण्याच्या सूचना केल्या आहेत. राजकुमार पाटील यांच्या नियोजनामुळे पूर्वीचे सरचिटणीस सुधीर धुमाळ यांची आठवण आली. आम्ही कार्यालयात येत असताना सर्व जबाबदारी धुमाळ यांच्यावर होती. त्यांची कमतरता कुठेही भासणार नाही असेच काम राजकुमार पाटील करत आहेत, असे म्हणत अजितदादांनी राजकुमार पाटील यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली.

‘तो’ गुलाल नेमका कुणाचा होता?

अजितदादांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभूत जागांवर नेमके भाष्य केले. मला कुणी कुणी बरंच काही सांगितलं आहे. कोण फुटला, कोण कुठे गेला?, कुणी चुका केल्या हेही सांगण्यात आलं आहे. सीट पडली तेव्हा कुणाच्या हातात गुलाल होता? हेही सांगण्यात आलं. नंतर बाळासाहेब पाटील विजयी झाले म्हणून त+ो गुलाल होता असेही मला सांगण्यात आले, असे म्हणत अजितदादांनी शिवाजीराव महाडिक यांच्या कोरेगाव सोसायटी मतदार संघातील पराभवावर भाष्य केले. पक्षातील नेत्यांना त्यांनी नाव न घेता इशाराच दिला. झालं गेलं गंगेला मिळालं निदान जिल्हा परिषद, पंचायत समितीच्यावेळी चुका करु नका, असेही अजितदादा म्हणाले.

सोळस्करांचे सर्व पक्षात मधुर संबंध…

सातार्‍याच्या राष्ट्रवादी भवनचे कौतुक करताना अजितदादांनी असेच काम तालुक्यातालुक्यात व्हावे, अशी अपेक्षा व्यक्‍त केली. समोर बसलेल्या बाळासाहेब सोळस्कर यांना उद्देशून अजितदादा म्हणाले, काही लोकांना आम्ही राज्य पातळीवर पदे दिली. अगदी मुंबई बाजार समितीचे चेअरमनपद दिले. त्यांनी थोडा पैसा पक्षाच्या कार्यालयांसाठी खर्च केला पाहिजे. सोळस्करांची तर कमालच आहे. राधाकृष्ण विखे-पाटील हेलिकॉप्टरने येतात. कृषि उत्पन्‍न बाजार समितीचे चेअरमन असतानाचे हे संबंध आहेत हे आमच्या लक्षात आले आहे. संबंध आहेत ते चांगले आहे. पण त्याचा पक्षाला जरा फायदा होवू द्या, असे म्हणत अजितदादांनी बाळासाहेबांना चिमटा काढला.

 

Back to top button