सुपुष्पा फुल : १६ वर्षांनी फुललेल्या ‘सुपुष्पा’मुळे महाबळेश्वरच्या सौंदर्याला चार चाँद! | पुढारी

सुपुष्पा फुल : १६ वर्षांनी फुललेल्या ‘सुपुष्पा’मुळे महाबळेश्वरच्या सौंदर्याला चार चाँद!

महाबळेश्वर; प्रेषित गांधी : महाबळेश्वरचे वेड लावणारे निसर्गसौंदर्य सर्वांनाच घायाळ करून जाते. या सौंदर्याला ‘सुपुष्पा’मुळेे ( सुपुष्पा फुल )आणखी चार चाँद लागले आहेत. तब्बल सोळा वर्षांनंतर येथील कॅसल रॉक आणि सावित्री पॉईंटवर फुललेल्या या अनोख्या फुलांची नजाकत थक्क करणारी आहे. या वनस्पतीचे स्थानिकांसह पर्यटकांनाही मोठे अप्रूप आहे. जैवविविधता संवर्धनाचा भाग म्हणून या फुलांचे संरक्षण करणारी मोहीम हाती घेण्यात आली आहे.

महाबळेश्वर हे निसर्ग सौंदर्याने नटलेले जागतिक स्तरावरील पर्यटनस्थळ आहे. येथील निसर्गाची मनमोहक रूपे पर्यटकांना मोहवून टाकत असतात. त्यामुळे जगभरातील पर्यटक 12 महिने या पर्यटनस्थळी हजेरी लावत असतात. महाबळेश्वरचे हे सौंदर्य सुपुष्पा फुलांच्या बहराने आणखी खुलले आहे.

कारवी वनस्पतीच्या अनेक प्रजाती पश्चिम घाटाच्या डोंगररांगांत आढळून येतात. कारवीच्या सर्व प्रजाती या प्रदेशनिष्ठ आणि अनोख्या सौंदर्याने जगभरात प्रसिद्ध आहेत. 3 वर्षे, 4 वर्षे, 6 वर्षे, 7 वर्षे आणि 12 वर्षांनंतर फुलांचा बहर येण्याची अनोखी निसर्गसाखळी असते. या प्रजातींपैकी ‘स्ट्रॉबीलँथस स्क्रॉबीक्युलाटस’ ही प्रजाती तब्बल सोळा वर्षांनंतर महाबळेश्वरमध्ये बहरली आहे. या वनस्पतीला मराठीमध्ये ‘सुपुष्पा’ किंवा ‘पिचकोडी’ असे म्हटले जाते. महाबळेश्वरच्या सौंदर्यात आणखी एक सुवर्ण व मनमोहक नजारा आपणास पाहावयास मिळत आहे.

सुमारे 10 ते 12 दिवसांपासून सुपुष्पाच्या फुलांच्या बहरास सुरुवात झालेली आहे. आणखी काही दिवस सुपुष्पाच्या फुलांना बहर येत राहणार आहे. त्यानंतर त्याचे रुपांतर बियांमध्ये होईल. पुढे सोळा वर्षांपासून असणारी ही वनस्पती मरून जाते अथवा निष्क्रिय होते. त्याजागी बियांपासून नवीन वनस्पतीची निर्मिती होऊन त्याची वाढ होत राहते. ही नैसर्गिक प्रक्रिया होण्यासाठी सुपुष्पाच्या फुलांचे परागीभवन होणे महत्त्वाचे असते. त्यासाठी निसर्गाने मधमाशी, फुलपाखरे व इतर कीटकांना परागीभवन करण्याची जबाबदारी दिलेली असते. हे सर्व घटक परागीभवन आपल्यापरीने करताना दिसत आहेत.

कॅसल रॉक व सावित्री पॉईंटवर परागीभवनासाठी पर्यटकांना बंदी ( सुपुष्पा फुल )

सुपुष्पा फुलांनी कॅसल रॉक व सावित्री पॉईंटवर नजारा फुलवला आहे. प्रसिद्ध ऑर्थरसीट पॉईंटच्या अलीकडे सुमारे 1 कि.मी. अंतरावर हा नजारा पाहायला मिळत आहे. परंतु याठिकाणी पर्यटकांची गर्दी व गोंगाट ऐकून मधमाशी, फुलपाखरे व कीटकांना परागीभवनासाठी अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे वनपरिक्षेत्र महाबळेश्वर यांनी सुपुष्पा फुलांचे परागीभवन प्रक्रिया नीट होण्याच्या द़ृष्टीने वनस्पतींच्या ठिकाणी पर्यटकांचा अडथळा होऊ नये यासाठी कॅसल रॉक व सावित्री ही दोन पर्यटनस्थळे काही दिवसांसाठी बंद ठेवली आहेत. त्यामुळे परागीभवनाची नैसर्गिक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडेल.

सुुपुष्पाची रंगसंगती फिक्कट जांभळी… ( सुपुष्पा फुल )

सुपुष्पा फुलांची रंगसंगती फिक्कट जांभळ्या रंगामध्ये आढळते. ही फुले आकाराने छोटी असून साधारणत: 0.7 ते 2 सें.मी.पर्यंत असतो. ही फुले गुच्छ स्वरूपात एकत्रितपणे उमलतात. सुपुष्पाची महाबळेश्वरमध्ये जी फुले आढळली आहेत, ती स्ट्रॉबीलँथस स्क्रॉबीक्युलाटस या प्रजातीची आहेत.

सुुपुष्पा सौंदर्य खुलवणारी; वनस्पतीच्या 22 प्रजाती ( सुपुष्पा फुल )

सुपुष्पा फुले सध्या तरी नैसर्गिक सौंदर्य खुलवताना दिसत आहेत. या फुलांच्या 22 प्रजाती असून त्याची कुठेही निर्यात अथवा विक्री होत नाही. औषधी म्हणूनही ही वनस्पती सध्या तरी वापरली जात नाही. वन विभागाकडून या फुलांच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहेत.

सुपुष्पा वनस्पतीच्या संरक्षण व संवर्धनाचा अहवाल तयार होणार

वनविभागाचे कर्तव्य म्हणून सुपुष्पा वनस्पती, त्याची बहरलेली फुले आणि परागीभवन करणारे वन्यजीव, कीटक यांचे संरक्षण करण्यात येईल. तसेच जैवविविधता संवर्धनाचा भाग म्हणून ही मोहीम सातारा वनविभागाद्वारे राबविण्यात येत आहे. या सुपुष्पा वनस्पतीचे संरक्षण व संवर्धनाबाबत अहवाल तयार करून मुख्य वनसंरक्षक, कोल्हापूर वनवृत्त यांना सादर करण्यात येणार आहे. मोहीम यशस्वी करण्यासाठी मुख्य वनसंरक्षक प्रा. डॉ. व्ही. क्लेमेंट बेन व सातारा वनविभाग कार्यरत आहे.

Back to top button