उदयनराजे मैदानात,आज सातार्‍यात; भव्य स्वागताची तयारी | पुढारी

उदयनराजे मैदानात,आज सातार्‍यात; भव्य स्वागताची तयारी

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यांचे आज सातार्‍यात आगमन होणार असून त्यांच्या समर्थकांकडून जिल्हा प्रवेश सीमेवर शिरवळ-निरा नदीजवळ जल्लोषी स्वागत करण्यात येणार आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत सर्वपक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातून खा. उदयनराजे हे इच्छुक आहेत. उमेदवारीसंदर्भात ते दिल्लीत तळ ठोकून होते. त्यांच्या उमेदवारीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ग्रीन सिग्नल दिला. महायुतीकडून खा. उदयनराजे भोसले यांची उमेदवारी निश्चित झाल्यामुळे समर्थकांनी त्यांच्या जल्लोषी स्वागताची तयारी केली आहे. हा स्वागतसोहळा दणक्यात करण्यासाठी कार्यकर्ते व पदाधिकारी रात्रंदिवस राबत आहेत. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले हे बुधवारी सातार्‍यात दाखल होत आहेत. जिल्ह्यात प्रवेश करताच त्यांचे शिरवळ येथे निरा नदीजवळ स्वागत करण्यात येणार आहे.

याशिवाय खंडाळा, भुईंज, जोशी विहिर, पाचवड, आनेवाडी, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, मोती चौक, राजवाडा ते जलमंदिर याठिकाणी उदयनराजे यांच्या स्वागताची जय्यत तयारी कार्यकर्ते व सातारा विकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी केली आहे. यावेळी आजी माजी लोकप्रतिनिधी, भाजपा पदाधिकारी, उदयनराजे प्रेमी उपस्थित राहणार आहेत. हा स्वागत कार्यक्रम आणखी दिमाखदारपणे व्हावा यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपा व घटक मित्र पक्षांच्यावतीने करण्यात आले आहे.

Back to top button