दिल्लीतून उदयनराजेंना सातार्‍यासाठी ग्रीन सिग्नल | पुढारी

दिल्लीतून उदयनराजेंना सातार्‍यासाठी ग्रीन सिग्नल

सातारा, पुढारी वृत्तसेवा : सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारीचा तिढा सुटत चालला असून, खा. उदयनराजे यांना उमेदवारीसाठी ग्रीन सिग्नल मिळाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत दिल्लीत झालेल्या भेटीनंतर सातार्‍यातून पुन्हा खा. उदयनराजे यांनाच भाजपमधून उमेदवारी दिली जाणार असल्याचे समर्थकांकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, खा. उदयनराजे आपल्या प्रचाराचा प्रारंभ बुधवार, दि.27 पासूनकरणार आहेत.

सातारा लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून महायुती आणि महाविकास आघाडीतील इच्छुकांमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. पक्षाची उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक प्रयत्नशील आहेत. माढा मतदारसंघात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपमधून उमेदवारी दिल्यानंतर सातार्‍याच्या जागेकडे लक्ष लागले होते. आचारसंहिता जाहीर होऊन 8 दिवस झाले तरी महायुती आणि महाविकास आघाडीने सातारा मतदारसंघात उमेदवारी जाहीर न केल्याने सस्पेन्स वाढला होता. सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीतून खा. उदयनराजे यांना उमेदवारी द्यावी, अशी आक्रमक मागणी कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी केली होती. त्यासाठी भाजप जिल्हाध्यक्षांना घेरावही घातला होता.

सातार्‍यात झालेल्या या उद्रेकामुळे भाजपचे संकटमोचक ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी खा. उदयनराजे यांची भेट घेऊन चर्चा केली होती. सातार्‍यात महायुतीतून उदयनराजे यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत गिरीश महाजन यांनी दिले होते. त्यानंतर बुधवारी खा. उदयनराजे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत चर्चा झाली. त्यानंतर मात्र खा. उदयनराजे भोसले हे दिल्लीला रवाना झाले. पाठोपाठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही दिल्लीत खा. उदयनराजे यांना भेटले. खा. उदयनराजे व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची रविवारी दिल्लीत भेट झाली. यावेळी जे. पी. नड्डाही उपस्थित होते. सातारा लोकसभा मतदारसंघातून खा. उदयनराजे हेच महायुतीचे उमेदवार असतील, असे खा. उदयनराजे यांच्या समर्थकांकडून सांगण्यात आले. दरम्यान, बुधवारी खा. उदयनराजे सातार्‍यात येणार असून, त्यांच्या प्रचाराची सुरुवात होणार आहे.

रणजितसिंह हेच उमेदवार

माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह निंबाळकर यांची उमेदवारी कापली जाणार असल्याच्या अफवा उठल्या होत्या; मात्र या मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर हेच महायुतीचे उमेदवार राहणार आहेत. रणजितसिंह निंबाळकर यांनी आपल्या प्रचाराला सुरुवातही केली आहे.

Back to top button