पुणेकरांचा पर्यटनासाठी देश-विदेशातील थंडगार ठिकाणे, बीच, बर्फाळ प्रदेशाकडे कल | पुढारी

पुणेकरांचा पर्यटनासाठी देश-विदेशातील थंडगार ठिकाणे, बीच, बर्फाळ प्रदेशाकडे कल

प्रसाद जगताप

पुणे : उन्हाळी सुट्या सुरू झाल्या अन् आता सुरुवात झालीय पर्यटन दौर्‍यांना. पुण्यातील अनेक पर्यटक कुटुंबीयांसह आता खासगी चारचाकी, बस, एसटी, रेल्वे आणि विमानाने पर्यटनासाठी राज्यासह देश-परदेशात टूर-टूर काढत आहेत. वाढत्या उन्हाळ्यामुळे या पर्यटकांची थंड हवेची ठिकाणे, बीचलगतची शहरे आणि बर्फाळ प्रदेशाकडे सर्वाधिक ओढा असल्याचे समोर आले आहे.
हवाहवाईला पसंती!

पुणे विमानतळावरून दररोज 90 विमाने उड्डाण करतात, तर तितकीच विमाने पुण्यात उतरतात. अशी एकूण 180 विमानांची उड्डाणे दिवसाला येथून होतात. त्याद्वारे दररोज 25 ते 30 हजार प्रवाशांना देशाच्या कानाकोपर्‍यांपर्यंत प्रवास करता येतो. सध्या पुणेकर जयपूर, लखनौ, वाराणसी, कोलकाता, गोव्यातील मोपा, बंगळुरू, दिल्ली, चंदिगढ, अमृतसर, चेन्नई, इंदोर, गुवाहाटी, हैदराबाद, कोचिन, अहमदाबाद आणि नागपूरसह विविध भागांत पर्यटनासाठी जात आहेत. पुण्यातून सध्या दुबई आणि सिंगापूर यासाठी आंतरराष्ट्रीय विमानोड्डाणे होत आहेत. असे असले तरी मुंबईमार्गे विविध देशांमध्ये पर्यटक जात आहेत.

महाराष्ट्रातही फिरा रे…

रायगड किल्ला, मुरुड-जंजिरा, माथेरान, घारापुरी लेण्या, पाली, महड, अलिबाग, श्रीवर्धन, दिवेआगर, हरिहरेश्वर, रत्नागिरी, दापोली, गुहागर, गणपतीपुळे, मार्लेश्वर, राजापूर, माचाळ, चिपळूण, विजयदुर्ग किल्ला, सिंधुदुर्ग किल्ला, मालवण, वेंगुर्ला, आंबोली, लोणावळा, खंडाळा, चिखलदरा, जव्हार, तोरणमाळ, पन्हाळा, पाचगणी, भंडारदरा, महाबळेश्वर, माथेरान, म्हैसमाळ, कास पठार सातारा, मुंबई, प्रतिपंढरपूर (वाडी)-राममंदिर अमळनेर, पद्मालय एरंडोल, चांगदेव मुक्ताई मंदिर, पाटणादेवी चाळीसगाव, पंचवटी (नाशिक), त्र्यंबकेश्वर, वणी, मांगीतुंगी, शिर्डी, शनी-शिंगणापूर, सिद्धटेक, भीमाशंकर, देहू, आळंदी, जेजुरी, मोरगाव, रांजणगाव, थेऊर, लेण्याद्री, ओझर (पुणे), शिखर शिंगणापूर (सातारा), औदुंबर (सांगली), कोल्हापूर, ज्योतिबा, नरसोबाची वाडी, कुंभोज महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर, किल्ले पन्हाळा, अक्कलकोट, पंढरपूर (सोलापूर), वेरुळ, पैठण (छ. संभाजीनगर), परळी वैजनाथ (बीड), औंढा नागनाथ (हिंगोली), तुळजापूर (धाराशिव), नांदेड, माहूर (नांदेड) बीड आदी ठिकाणी पर्यटकांचा जास्त कल असल्याचे दिसून येते.

पुणे जिल्ह्यात काय पाहाल?

शनिवारवाडा, लालमहाल, कसबा गणपती, दगडूशेठ गणपती, सारस बाग, पर्वती मंदिर व संग्रहालय, कात्रज सर्पोद्यान व प्राणिसंग्रहालय, केळकर संग्रहालय, कस्तुरबा पॅलेस व म्युझियम, बालगंधर्व रंगमंदिर, संभाजी गार्डन, खडकवासला धरण, सिंहगड, पानशेत, वरसगाव धरण, निळकंठेश्वर, थेऊरचा गणपती, रामदरा, मुळशी धरण, पळसे धबधबा, कोळवडे मसोबा, लवासा सिटी, हाडशी साईबाबा मंदिर, प्रतिशिर्डी सोमटणे फाटा, भाजे लेण्या, एकविरा मंदिर व कार्ले लेण्या, खंडाळा घाट, कानिफनाथ मंदिर, प्रतिबालाजी केतकावळे, पुरंदर किल्ला, नारायणपूर दत्त मंदिर, जेजुरी, मयूरेश्वर मोरगाव, ओझर, लेण्याद्री, शिवनेरी किल्ला, खोडद दुर्बीण, किल्ले राजगड, तोरणागड, सिंहगड, शिवनेरी येथेही पर्यटक भेट देत आहेत.

एमटीडीसी रिसॉर्टला प्राधान्य

उन्हाळी सुट्यांमुळे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) रिसॉर्टला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अजंटा फर्दापूर, वेलणेश्वर, ताडोबा, माळशेज, भंडारदरा, तारकार्ली, लोणार, भीमाशंकर, कार्ला, हरिहरेश्वर, छ. संभाजीनगर, महाबळेश्वर, नागपूर, सिल्लारी, पानशेत, खारघर, माथेरान, कुणकेश्वर, चिखलदरा, कोयना लेक, शिर्डी, वर्धा, ग्रेप पार्क, टिटवाळा, एलिफंटा, सिंहगड रिसॉर्ट, पर्यटक निवास निरा नरसिंहपूर या एमटीडीसी रिसॉर्टला पर्यटकांची पसंती लाभत आहे. मात्र, एमटीडीसीचे दर हे सर्व सामान्यांना परवडणारे नाहीत. त्यामुळे या दरामध्ये शासनाने सवलत द्यावी, अशी मागणी पर्यटकांकडून केली जात आहे.

पुण्यातून राज्यभरातील विविध पर्यटनस्थळांच्या दिशेने जाणार्‍या एसटीच्या गाड्या फुल्ल झाल्याचे दिसत आहे. अनेक जण सुट्यांमुळे गावीदेखील जात आहेत. त्यातच पुण्यातून नाशिक, छ. संभाजीनगर, अकोला, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या भागात जाण्यासाठी एसटीच्या गाड्यांना सर्वाधिक गर्दी होत आहे. एसटीच्या पर्यटन गाड्यांनासुध्दा पर्यटकांचा प्रतिसाद मिळत आहे. एसटीच्या महाबळेश्वर, बुलढाण्यातील चिखलदरा, नाशिकला वणीची देवी, अष्टविनायक या भागात जाणार्‍या गाड्यांना प्रवाशांची गर्दी होत आहे.

– ज्ञानेश्वर रणावरे, वरिष्ठ आगार व्यवस्थापक, शिवाजीनगर आगार.

उन्हाळी सुट्या असल्यामुळे अनेक नागरिक आपापल्या गावी निघाले आहेत. त्यामुळे बस-गाड्यांना चांगले बुकिंग मिळत आहे. राज्यातील विविध पर्यटनस्थळांकडे जाणार्‍या आमच्या गाड्या फुल्ल जात आहे. या वेळी प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याला विशेष प्राधान्य दिले जात आहे.

– किरण देसाई, कार्याध्यक्ष, पुणे बस अँड कार ओनर्स असोसिएशन

उन्हाळ्यामध्ये पर्यटक हिमाचल प्रदेश, जम्मू-कश्मीर, लेह-लदाख, यांसारख्या बर्फाळ भागात जाण्याला पसंती देत आहेत. त्यामुळे आम्ही या भागामध्ये पर्यटकांना टूर पॅकेजेस उपलब्ध करून देत आहोत. नुकतीच उत्तराखंडसाठी मानसखंड एक्स्प्रेस रवाना झाली. पुढच्या महिन्यातसुद्धा ही गाडी पुन्हा पाठवली जाणार आहे.

– आलोक सिंग परमार, एरिया एक्झिक्युटिव्ह, आयआरसीटीसी, पुणे

शहरातील उष्ण वातावरण पाहता पर्यटक थंड हवेच्या ठिकाणी जाण्यावर भर देत आहेत. यात हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, कुलू मनाली, उत्तराखंड आणि केरळातील मुन्नार भागात जाण्याकडे कल आहे. विदेशातील युरोप, यूएसए, स्कॉटलँड, साऊथ आफि—का या देशांमध्येही पर्यटक जात आहेत.

– नीलेश भन्साळी, पर्यटनतज्ज्ञ

हेही वाचा

Back to top button