राष्‍ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदेंच्या पराभवानंतर वसंतराव मानकुमरेंचा ओ शेठ.. गाण्यावर तुफान डान्स (Video) | पुढारी

राष्‍ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदेंच्या पराभवानंतर वसंतराव मानकुमरेंचा ओ शेठ.. गाण्यावर तुफान डान्स (Video)

कुडाळ ; पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या पराभवानंतर राष्ट्रवादी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे नेते वसंतराव मानकुमरे यांनी तुफान डान्स केला. ओ शेठ तुम्ही नादच केला थेट.. या गाण्यावर शशिकांत शिंदे यांच्या पराभवाचा आनंद राष्ट्रवादीचे वसंतराव मानकुमरे यांनी चांगलाच लुटला.

सातारा जिल्हा बँकेची निवडणूक लागल्यापासून निकाल लागेपर्यंत राष्ट्रवादीचे नेते वसंतराव मानकुमरे यांनी शशिकांत शिंदे यांच्या विरोधात सर्व फासे आवळले होते. भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक ज्ञानदेव रांजणे यांना जोरदार पाठिंबा देत जावळी तालुक्यातील 25 सोसायटी मतदार संघाचे निवडणूक मतदान प्रतिनिधी यांना सहलीवर एक महिना फिरवले. कधी राजस्थान कधी केरळ कधी गोवा अशा एक महिना पंचवीस मतदारांना सहलीवर घेऊन जाणारे राष्ट्रवादीचे वसंतराव मानकुमरे यांनी शशिकांत शिंदे यांना चांगलाच या निवडणुकीमध्ये शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या ताकदीवर झटका दिला.

प्रत्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले या निवडणुकीमध्ये भलेही नामानिराळे असले व सत्ताधारी पक्षाबरोबर असले तरी ज्ञानदेव रांजणी यांच्या विजयामध्ये शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सिंहाचा वाटा असल्याचे बोलले जात आहे. प्रत्यक्ष ज्ञानदेव रांजणी हे उमेदवार नसून या निवडणुकीत दस्तुरखुद्द पडद्यामागचे शिवेंद्रसिंहराजेंचे उमेदवार असल्याची चर्चा सातारा जिल्ह्यामध्ये जोर धरू लागली आहे.

त्यामुळे अवघ्या एका मताने विजय झालेल्या शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कट्टर समर्थक ज्ञानदेव रांजणे यांचा विजय झाल्यानंतर राष्ट्रवादीचे वसंतराव मानकुमरे यांच्या वसंत गडावर राष्ट्रवादीच्याच जावळी तालुक्यातील या कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या गजरात व बँड बाजा समोर डान्स करून आनंद लुटला.

पहा व्हिडिओ : शशिकांत शिंदेंच्या पराभवानंतर वसंतराव मानकुमरेंचा ओ शेठ.. गाण्यावर तुफान डान्स

Back to top button