Nagpur Crime : शिकावू महिला डॉक्टरवर गोळीबाराचा प्रयत्न, एकतर्फी प्रेमातून तरुणाचे कृत्‍य | पुढारी

Nagpur Crime : शिकावू महिला डॉक्टरवर गोळीबाराचा प्रयत्न, एकतर्फी प्रेमातून तरुणाचे कृत्‍य

नागपूर : पुढारी वृत्तसेवा

शिकावू (इंटर्न) महिला डॉक्टरवर गोळीबाराचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरात उघडकीस आला आहे. नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्‍या (मेडिकल) ई लायब्ररीजवळ हा थरार घडला. ( Nagpur Crime : ) एकतर्फी प्रेमातून सोशल मीडियावर मैत्री झालेल्या मित्राने महिलेवर गोळीबाराचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यातून पीडिता बालंबाल बचावली.

Nagpur Crime : गोळी बंदुकीतच अडकली, मोठा अनर्थ टळला

सोमवारी रात्रीच्या सुमारास नागपुरातील मेडिकलच्या अधिष्ठाता इमारतीच्या शेजारी असलेल्या ई लायब्ररीजवळ हा प्रकार घडल्याची माहिती आहे. संबंधित शिकावू महिला डॉक्टर गेल्या काही दिवसांपासून बोलत नसल्याच्‍या रागातून संशयित विकी चकोले याने तिला भेटण्यासाठी मेडिकलमधील ई-लायब्ररीजवळ बोलावले.आरोपी आणि पीडिता हे दोघे जण बोलत असताना अचानक त्यांच्यात वादावादी झाली. त्यावरुन काही कळण्याच्या आतच आरोपीने खिशातून बंदूक काढली. ती तरुणीवर रोखली. त्याने बंदुकीचा ट्रिगरही दाबला होता. मात्र सुदैवाने गोळी बंदुकीतच अडकल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

शिकावू महिला डॉक्टर आरडाओरडा केला, जवळपास असलेल्या इतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या दिशेने धाव घेतली. संशयित घटनास्‍थळावरुन पसार झाला. एकतर्फी प्रेमातून तरुणाने महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. दरम्यान, या प्रकरणी नागपुरातील अजनी पोलीस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचलं का?

पाहा व्‍हिडिओ :

 

 

Back to top button