जन-धन खात्यांमधील धनाचा ‘धनी’ कोण? | पुढारी

जन-धन खात्यांमधील धनाचा ‘धनी’ कोण?

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

जन-धन खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात होत असलेल्या कथित धांदलीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी केंद्र सरकारवर निशाणा साधला. एका प्रसारमाध्यमातील रिपोर्टचा हवाला देत राहुल गांधींनी, जन-धन खात्यांमधील धन कुणाच्या खात्यात जात आहे, या धनाचा धनी कोण आहे, असा सवाल ट्विटरवरून केला आहे. राहुल गांधींनी ज्या रिपोर्टचा हवाला दिला आहे, तो आयआयटी मुंबईने बनवला आहे.

या अभ्यासात दावा केला आहे की, स्टेट बँक ऑफ इंडियाने जन-धन खात्यांमधून एकूण 164 कोटी रुपये इतक्या रकमेची कपात केली आहे. सन 2017 ते सप्टेंबर 2020 या काळात स्टेट बँक ऑफ इंडियाने यूपीआय आणि रूपे कार्डवरून झालेल्या व्यवहारांतून जन-धन खातेधारकांच्या खात्यांमध्ये जवळपास 254 कोटी रुपये जमवले.

त्यानंतर प्रत्येक खात्यामधून 17 रुपये 70 पैशाची कपात केली. म्हणजे जवळपास 164 कोटी रुपयांची कपात या जन-धन खात्यांमधून झाली आहे. त्यावरून राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ते लोक कोण आहेत, ज्यांच्या बँक खात्यामध्ये जन-धन खात्यांमधून कपात केलेले हे पैसे जात आहेत? असा सवाल त्यांनी केला आहे.

राहुल गांधी सातत्याने मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप करत असून 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी राफेल करारातील भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. अर्थात त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला राफेल प्रकरणात क्लीन चिट दिली होती.

हेही वाचलं का?

Back to top button