महायुतीत नाराजी नाही : चंद्रशेखर बावनकुळे | पुढारी

महायुतीत नाराजी नाही : चंद्रशेखर बावनकुळे

कराड; पुढारी वृत्तसेवा :  पुण्याच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या संमतीनेच झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीत आले त्या दिवशी त्यांना पुण्याचे पालकमंत्री दिले जाणार असल्याचे स्पष्ट होते, असे सांगत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीत नाराजी नसल्याचे कराड येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. यावेळी डॉ. अतुल भोसले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, मनोज घोरपडे, रामकृष्ण वेताळ, तालुका अध्यक्ष धनाजी पाटील आदी उपस्थित होते.

आ. बावनकुळे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज नव्हतेच. मंत्रिमंडळ विस्तार करून पालकमंत्री पदाचे वाटप व्हावे, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची इच्छा होती. आता लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल असे आपणास वाटते. पोलिस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची करण्यात आलेली नियुक्ती योग्यच आहे. महाविकास आघाडीच्या काळात अधिकार्‍यांना टार्गेट करून त्यांच्यावर खटले भरले होते. महायुती मात्र चांगले काम करणार्‍यांना न्याय देऊन साईड ट्रॅकवर गेलेल्या अधिकार्‍यांना मुख्य प्रवाहात आणून राज्याच्या हिताचे निर्णय घेत आहे. देशातील धार्मिक स्थळे लष्कराने ताब्यात घ्यावीत अशा प्रकारे प्रकाश आंबेडकर यांनी वक्तव्य करणे योग्य नाही. आमदार बच्चू कडू आमचे मित्र आहेत. त्यांना सोबत घेऊन पुढे वाटचाल करणार आहे. भाजपाला पाठिंबा न देणारे तुरुंगात जातात हे शरद पवार यांचे वक्तव्य केवळ स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी व गट जिवंत ठेवण्यासाठी आहे असेही बावनकुळे यांनी सांगितले.

अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या लागलेल्या बॅनरवरून विचारले असता बावनमुळे म्हणाले, कार्यकर्त्याला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असे वाटते. काँग्रेसमध्ये तर प्रत्येक जिल्ह्यात एक मुख्यमंत्री आहे, असे सांगत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर, बाळासाहेब थोरात या काँग्रेस नेत्यांचा उल्लेख करत त्यांचे बोर्ड लागतात याकडे लक्ष वेधले. तसेच 2024 पर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहणार असेही बावनकुळे म्हणाले.

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाने हिंदू धर्म जमिनीत गाडू हे केलेले वक्तव्य महाविकास आघाडीला मान्य असेल तर महाराष्ट्रातील साडे तेरा कोटी जनता महाविकास आघाडीला धडा शिकवेल. इंडिया आघाडीला हे वक्तव्य मान्य आहे का ? शरद पवार, नाना पटोले व उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले पाहिजे. यापूर्वी मी त्यांना 12 वेळा विचारले असल्याने बावनकुळे म्हणाले.

Back to top button