कराड : डॉक्टरच्या घरात शस्त्राच्या धाकाने जबरी चोरी; १० तोळ्‍याच्या दागिन्यांसह १२ लाख रूपये लंपास | पुढारी

कराड : डॉक्टरच्या घरात शस्त्राच्या धाकाने जबरी चोरी; १० तोळ्‍याच्या दागिन्यांसह १२ लाख रूपये लंपास

कराड : पुढारी वृत्तसेवा कराडलगत असलेल्या शिंदे मळ्यात डॉक्टरच्या घरात शस्त्राचा धाक दाखवून चोरट्यांनी जबरी चोरी केली. यामध्ये 10 तोळे दागिन्यासह बारा लाख रुपये चोरट्यांनी लंपास केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सोमवार दिनांक १० रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या अनुषंगाने सूचना केल्या.

कराडलगत असलेल्या शिंदे मळ्यामध्ये डॉ. राजेश शिंदे यांचे हॉस्पिटल आहे. तेथेच ते वास्तव्य करत आहेत. रविवारी रात्री डॉ. राजेश शिंदे यांच्यासह इतर नातेवाईक घरात झोपलेले असताना पहाटे तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास चोरट्याने पाठीमागील जिन्यावरून त्यांच्या घरात प्रवेश केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. डॉक्टर झोपत असलेल्या रूममध्ये चोरट्याने प्रथम प्रवेश केला. त्यांनी डॉक्टरांना शस्त्राचा धाक दाखविला. त्यानंतर डॉक्टरांच्या रूममधून आवाज येत असल्याने खालील रूममध्ये झोपलेले इतर नातेवाईक डॉक्टरांच्या रूममध्ये गेले. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्यासह डॉक्टरांना शस्त्राचा धाक दाखवून पैसे व दागिने ठेवलेल्या रूममध्ये आणले. तेथील कपाटातील सुमारे दहा तोळ्याचे दागिने व बारा लाख रुपये घेऊन चोरट्याने तेथून पोभारा केला.

दरम्यान याबाबतची माहिती मिळताच रात्र गस्तीवर असलेले पोलीस निरीक्षक सराटे यांनी त्वरित कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारीही त्वरित घटनास्थळी पोहोचले. तसेच जबरी चोरीची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या अनुषंगाने अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. तसेच नेमकी चोरी कशी झाली, दागिने व रोख रक्कम किती गेली आहे, याचीही माहिती घेण्याचे काम सुरू आहे. चोरटे नक्की किती होते, ते कोठून आले घरात चिखल पडलेला दिसत होता तो चोरट्यांच्या पायानेच आला आहे का? याचीही माहिती पोलीस घेत होते.

हेही वाचा : 

Back to top button