पडसाद भूकंपाचे : बारामतीत सुळे यांच्याविरुद्ध भाजपकडून कोण? | पुढारी

पडसाद भूकंपाचे : बारामतीत सुळे यांच्याविरुद्ध भाजपकडून कोण?

रामदास डोंबे

खोर(पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उलथापालथ झाल्याने आगामी बारामती लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा चेहरा असलेल्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. परंतु, अजूनही भाजपने या मतदारसंघात कोण लढणार हे स्पष्ट न केल्याने अनेक चर्चा रंगल्या आहेत. मोठा गाजावाजा करत असलेल्या भारतीय जनता पक्षाचा लोकसभेचा चेहरा मात्र अद्याप समोर न आल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू आहे. सन 2019 च्या निवडणुकीमध्ये भाजपच्या कांचन कुल यांनी सुप्रिया सुळे यांच्या समोर आव्हान निर्माण केले होते. बारामतीची जागा जिंकायचीच असा निर्धार करत भाजपने मोठी यंत्रणा बारामती मतदारसंघात कामाला लावत राष्ट्रवादीला पर्यायाने पवार कुटुंबाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता.

भाजपच्या देश आणि राज्य पातळीवरील नेत्यांनी सभांच्या माध्यमातून पवार कुटुंबीयांविरोधात वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी राष्ट्रवादीकडून शरद पवार, अजित पवार आणि अन्य नेत्यांनी खिंड लढवत भाजपवर प्रतिहल्ला चढवला. विशेषत: भाजपकडून बारामतीची जागा अत्यंत प्रतिष्ठेची करण्यात आली तरीही विजय मिळविण्यात राष्ट्रवादीला यश आले. अगदी शेवटच्या क्षणी दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती,तरीही त्यांनी अत्यंत चांगली लढत दिली.

मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून ‘मिशन बारामती’साठी अजूनही उमेदवार निश्चिचत झालेला नाही. आमदार राहुल कुल यांची बारामती लोकसभा निवडणुकीच्या प्रमुखपदी निवड करून या मतदारसंघाची धुरा त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. मात्र, खासदार सुळे यांच्या पुढे लढण्यास अजून तरी भाजपाकडून उमेदवार निश्चित करण्यात आलेला नाही. आगामी काळात सुळे यांना शह देण्यासाठी भाजपा काय पाऊल उचलणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

भाजपने बारामती मिशन लोकसभेसाठी हाती घेतल्यावर सुप्रिया सुळे यांनी मतदारसंघात गावोगावी दौरा आयोजन करून भेटी गाठीला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष, साखर कारखाने, बँक अध्यक्ष यांना बरोबर घेऊन दौरे आखण्यात आले. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. त्यातच सुळे यांनी त्यांच्या 20 वर्षांच्या राजकारणात स्वतःचा गट बांधला नाही. त्यांनी गटबांधणी केली असती, तर आज बारामतीत काही प्रमाणात सुळे यांची ताकद दिसली असती.

परंतु, पक्षातील फुटीनंतर अजित पवार यांच्यापुढे सुळे यांची कोणतीही ताकद बारामतीत उरलेली नाही असे चित्र आहे. बारामती विधानसभा मतदारसंघाने दिलेल्या एकहाती मताधिक्क्याच्या जोरावर त्या संसदेत प्रतिनिधित्व करीत होत्या. आता येथील स्थिती त्यांच्यासाठी अधिकच धोकादायक बनली आहे. त्यामुळे सध्याची राजकीय समीरकणे पाहता दौंडच्या कांचन कुल पुन्हा एकदा सुळे यांना आव्हान देणार का ? हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

हेही वाचा

कोल्हापूर : जिल्ह्यात दुसरे मंत्रिपद मिळणार का ? आ. कोरे, आवाडे, आबिटकर चर्चेत

थेट पाईपलाईन ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार; सतेज पाटील यांची ग्वाही

नाशिक : बहिणीचे प्रेमसबंध जुळवून दिल्याच्या रागातून महिलेचा खून, अल्पवयीन भाऊ पोलिसांच्या ताब्यात

Back to top button