भिंतीला खरोखरच कान असतात का? | पुढारी

भिंतीला खरोखरच कान असतात का?

सेऊल : काही तरी गुपित बोलत असताना आपण सहज बोलून जातो, हळू बोल, भिंतींनाही कान असतात! याचाच सरळ अर्थ असा की, भिंतीच्या पलीकडे कोणी तरी असेल आणि त्या व्यक्तीला ते ऐकू जाईल. पण, भिंतीच्या आरपार ऐकता येऊ शकते का, खरोखरच भिंतीला देखील कान असतात का, यावर शास्त्रज्ञांचे स्पष्टीकरण अतिशय रंजक आहे.

भिंतींनाही कान असतात, या म्हणीची सुरुवात उत्तर प्रदेशमधील लखनऊच्या प्रसिद्ध असिफी इमामबाड्यातून झाली. या इमामबाड्याला भूलभुलैया किंवा बडा इमामबारा असेही म्हणतात. वक्र रचना, समान मार्ग, कलाकृती, कोरीव काम आणि अनेक बोगदे यामुळे ते खास ठरत आले आहे. इथल्या भिंतींचे वैशिष्ट्य म्हणजे एखाद्या कोपर्‍यात भिंतीजवळ काही कुजबुजले तर या भिंतींवर कान ठेऊन ते कोणत्याही कोपर्‍यात ऐकू येते. त्याचा हॉल 165 फूट लांब आहे; पण एका कोपर्‍यात हळूवारपणे बोलले, तरी ते दुसर्‍या कोपर्‍यात देखील सहजपणे ऐकता येते.

याचे कारण सभागृहात बनवलेल्या काळ्या-पांढर्‍या पोकळ रेषा असल्याचे सांगितले जाते. या पोकळ रेषांमुळे आवाज एका कोपर्‍यातून दुसर्‍या कोपर्‍यात घेऊन गेला जातो. नवाब असफ-उद-दौलाने आपल्या सैन्यात लपलेले हेर टाळण्यासाठी आणि शत्रूला पकडण्यासाठी ही पद्धत अवलंबल्याचे सांगितले जाते. पण यामागे शास्त्रीय आधारही आहे. इनसाईड सायन्सच्या अहवालानुसार, जपान आणि दक्षिण कोरियाच्या वैज्ञानिकांनी यावर संशोधन केले. त्यांनी भिंतीला एक अतिशय अरुंद छिद्र पाडून त्याच्या एका बाजूला प्लास्टिकचा पडदा ठेवला. तिथे कान लावून आवाज अगदी स्पष्टपणे ऐकू आला.

इतकेच नाही तर हा आवाज 75%-100% पर्यंत ऐकू आला. या अरुंद छिद्रांना भिंतींचे कान देखील म्हणू शकता येईल. विशेष बाब म्हणजे या छिद्रामध्ये जर झिल्ली बसवली नसेल, म्हणजेच ती एका बाजूने उघडी असेल तर आवाज ऐकू येणार नाही. त्यामुळे भिंती साऊंडपू्रफ करायच्या असतील म्हणजेच तुमचा आवाज कोणीही ऐकू नये असं तुम्हाला वाटत असेल, तर ध्वनिरोधक बोर्ड किंवा शीट बसवावी लागेल. भिंतीला कान असणे म्हणजे काय, हेच यामुळे शास्त्रज्ञांनी अधोरेखित केले आहे.

Back to top button