बुसान : जगाच्या पाठीवर असे अनेक देश आहेत, जेथे विवाहाच्या निरनिराळ्या पद्धती, रीतिरिवाज आहेत. कित्येक दशकांपासून, शतकांपासून ते असे रीतिरिवाज अगदी कटाक्षाने पाळत आले आहेत. पण, यातही काही देश असे आहेत, जिथे नवरदेवाचा मान राखणे तर दूर, उलट नवरदेवाला बेदम मारहाणही केले जाते. दक्षिण कोरिया हा देश त्यापैकीच एक असून, येथे नवरदेवाला चक्क उलटे टांगून चपलेने मारहाण करण्याची पद्धत आहे. असे मारले तरच नवरदेवाचे, त्याच्या कुटुंबीयांचे कल्याण होते, असे कारण या परंपरेमागे दडले असल्याचा स्थानिकांचा दावा रहात आला आहे.
दक्षिण कोरियातील या प्रथेनुसार, सर्वात आधी नवरदेवाचे मित्र त्याच्या पायाला काठी बांधतात आणि त्याला उलटे टांगतात. यानंतर त्याला काठीने मारहाण करण्यात येते. काही लोक तर वराला बूट आणि चप्पलने मारहाण करतात. काही लोक वराला येलो कॉर्विना या माशानेही मारतात. या मारहाणीतील विशेष बाब म्हणजे केवळ वराच्या तळव्यांनाच काठ्या, शूज किंवा चप्पलने इजा केली जाते. या दरम्यान वराच्या पायातील शूज काढले जातात. एकंदरीत लग्नानंतर नवरेदवाला चांगलाच चोप दिला जातो.
दक्षिण कोरियातील विवाह सोहळ्यात पार पडणार्या या विधीदरम्यान मुलीच्या बाजूचा कोणताही सदस्य यात सहभागी होत नाही. ही मारहाण वराचे मित्र आणि नातेवाईकच करतात. ही विचित्र परंपरा आजही दक्षिण कोरियामध्ये कोणत्याही संकोच किंवा बंधनाशिवाय पाळली जाते. दक्षिण कोरियातील लोक लग्नातील हा विधी पूर्ण उत्साहात आणि आनंदाने साजरा करतात. कोरियाच्या लोकांचा असा विश्वास आहे, की जर वराने हा विधी पार पाडला, तर त्याला त्याच्या वैवाहिक जीवनात फार कमी समस्यांचा सामना करावा लागतो. या काळात त्याला सतत प्रश्न विचारले जातात. लग्नात हा विधी करण्यामागे एक मोठं कारण आहे.
दक्षिण कोरियाच्या लोकांचा असा विश्वास आहे, की वराने काहीही न बोलता मार खात वधूसमोर आपले पुरुषत्व सिद्ध केले, त्याच वेळी त्यांना जीवनात कोणत्याही समस्या येत नाहीत. कारण नवरदेव अगोदरच मार खाऊन आयुष्यभरासाठी मजबूत बनतो. येलो कॉर्विना माशाने मारले जाण्यामागे एक कारण आहे. लोक म्हणतात, की या माशाने जोरात मार लागतो. या माशाने मारल्यानंतर वराला आयुष्यभर बळ मिळते. मात्र, आता हा विधी ताकदीची चाचणी म्हणून करमणुकीसाठीच जास्त केला जातो.