फडणवीसांच्या सभांनी राष्ट्रवादीला धडकी | पुढारी

फडणवीसांच्या सभांनी राष्ट्रवादीला धडकी

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  दरमहिन्याला होणारे केंद्रीय मंत्र्यांचे मायक्रो प्लॅनिंग असणारे दौरे, जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यात अ‍ॅक्टिव्ह केल्या गेलेल्या बूथ कमिट्या, प्रत्येक पंचायत समिती गणात जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांनी केलेले झंझावाती दौरे या सार्‍या एकजुटीचा परिणाम म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दहिवडी व कराडमध्ये झालेल्या सभांना दिसलेली गर्दी पाहता लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या द़ृष्टीने तयारीमध्ये मागे राहिलेल्या राष्ट्रवादीला धडकी भरवणारे वातावरण तयार झाले आहे. भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सहा आमदार व दोन खासदार निवडून आणण्याची रणनीती जिल्ह्यात आखली आहे. या रणनीतीला राष्ट्रवादीकडून पुढच्या 24 तासांत कोणतेही प्रत्युत्तर आले नाही.

सातारा जिल्हा कधीकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला. मध्यंतरी झालेल्या नगरपंचायत, बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी अनेक ठिकाणी बॅकफूटवर आली आहे. राज्यात अनेक ठिकाणी शिंदे गट व भाजपच्या विरोधात वातावरण असताना
शरद पवारांना मानणार्‍या सातारा जिल्ह्यात मात्र राष्ट्रवादीचा नेता कोण? हेच ठरेनासे झाले आहे.

भाजप वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून गावोगावी जाण्याचा प्रयत्न करत आहे. पंतप्रधान मोदींच्या 9 वर्षे पूर्तीच्यानिमित्ताने वेगवेगळे उपक्रम जिल्ह्यात राबवले जात आहेत. जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर आ. जयकुमार गोरे यांनी अनेक बेरजा केल्या आहेत. ग्राऊंडवर राहणे, शासकीय अधिकार्‍यांमार्फत लोकांची कामे करणे, बुथ कमिट्या अ‍ॅक्टिव्ह करणे, भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ताकद देणे ही जयकुमार गोरे यांनी आत्मसात केलेली नवी स्वभावनीती आहे. जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी प्रत्येक पंचायत समिती गणात दौरे केले आहेत. त्यांना खा. रणजितसिंह ना. निंबाळकर, खा. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रराजे भोसले, डॉ. अतुल भोसले, प्रभाकर घार्गे, धैर्यशील कदम, मनोज घोरपडे, मदनदादा भोसले, जयकुमार शिंदे, विक्रम पावस्कर व भाजपच्या संघटनेचीही साथ मिळत आहेत.

केंद्रीय मंत्र्यांचे सतत दौरे जिल्ह्यात होत आहे. भाजप पक्ष संघटना वाढवणे, केंद्राचा निधी गावोगावी पोहोचतो आहे की नाही हे पाहणे, बुथ कमिट्यांशी चर्चा करणे हे या दौर्‍याचे वैशिष्ट्य राहिले आहे. या उलट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांचे सातारा जिल्ह्यात अलिकडच्या दोन वर्षांमध्ये झालेले दौरे केवळ रयत शिक्षण संस्थेच्या उपक्रमांसाठी राहिले आहेत. अजितदादांनी एकदोन ठिकाणी घेतलेले दौरे वगळता राष्ट्रवादी काँग्रेसचा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कोणताही कार्यक्रम, उपक्रम झालेला दिसत नाही. मुळातच राष्ट्रवादी पूर्वी रामराजे ना. निंबाळकर विधान परिषदेचे सभापती असताना त्यांच्या नेतृत्वाखाली एकसंघ होती. आता रामराजे सभापती नाहीत. ते नुसते आमदार आहेत. शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील हे माजी पालकमंत्री आहेत. बाकी इतरांचा धरबोळच राहिलेला नाही. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीत नेता कोण? अशी परिस्थिती सध्या आहे. याउलट काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या तरण्याबांड जयकुमार गोरेंना जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांनी आमदार, खासदार व पक्ष संघटनेतील कार्यकर्त्यांनी नेता म्हणून स्वीकारले आहे. त्याचीच फलनिष्पत्ती भाजपची पक्ष संघटना वाढीस लागण्यात झाली आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल कराड व दहिवडीमध्ये घेतलेल्या भाजपच्या सभांना मिळलेला उत्स्फूर्त प्रतिसाद भाजप जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यात पोहोचत आहे हेच दर्शवत आहे. कराडमध्ये डॉ. अतुल भोसले यांनी केलेले सभेचे नियोजन आणि दहिवडीत आ. जयकुमार गोरे यांनी दाखवलेला करिश्मा राष्ट्रवादीला धडकी भरवणारा आहे. दस्तुरखुद्द देवेंद्र फडणवीस यांनी ही ऐतिहासिक, अतिविराट अशा शब्दात या नियोजनाचे वर्णन केले आहे.

सद्यस्थितीत सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीचा एक खासदार व विधानसभेचे तीन आमदार आहेत. पूर्वी 9 आमदार, 2 खासदार देणारा हा पक्ष झपाट्याने बॅकफूटवर येवू लागला आहे. एकाच घरात तीन तीन पदे देणे, कंत्राटदार जोपासणे, स्वत:च्याच विश्वात मश्गुल राहणे, बुथ कमिट्यांचा विचार न करणे, छोट्या गावातील कार्यकर्त्यांना न मोजणे या गर्विष्ठपणामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांबद्दलची प्रतिमा दिवसेंदिवस बदलत आहे. याउलट भाजपचे नेते पक्ष शिस्तीच्या चौकटीत संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताकद देताना दिसत आहेत. त्यामुळेच भाजपच्या सभांना सातारा जिल्ह्यात गर्दी दिसू लागली आहे. भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 6 आमदार व 2 खासदारांचे केलेले नियोजन, कोेअर कमिटीच्या बैठकीत बलाढ्य नेत्यांना फडणवीसांनी दिलेली तंबी पाहता राष्ट्रवादीने सुधारणा केली नाही तर भाजपचा नारा यशस्वी होवू शकतो.

Back to top button