पाण्याअभावी कोयना वीज प्रकल्प ठप्प होण्याची भीती | पुढारी

पाण्याअभावी कोयना वीज प्रकल्प ठप्प होण्याची भीती

चिपळूण : महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखल्या जाणार्‍या कोयना धरणातील पाण्याची पातळी खालावली आहे. यामुळे कोयना वीज प्रकल्प ठप्प पडण्याच्या मार्गावर आहे. कोळकेवाडी येथील चौथ्या टप्प्यातील वीजनिर्मिती पूर्णपणे ठप्प झाली असून येत्या काही दिवसांत पाऊस न झाल्यास पहिल्या, दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्याची वीजनिर्मितीही बंद होणार आहे. धरणात शिल्लक असलेले पाणी मृतजल ठरले आहे.

सकाळी व सायंकाळी विजेची नितांत गरज असताना कोयना वीज प्रकल्प चालविला जातो. पाण्यावर होणारी वीज ही सर्वात स्वस्त आहे. त्यामुळे अतिउच्च मागणीच्यावेळी कोयना वीज प्रकल्प चालवून विजेची गरज भागवली जाते. कोयना धरणाची जलसाठवण क्षमता 105 टीएमसी असून 1 जूनपासून जलवर्ष समजले जाते व त्यानंतर धरणात जमा होणारे पावसाचे पाणी मोजले जाते. मात्र, या वर्षी जूनचा निम्मा महिना संपत आला तरी पावसाने जोर धरलेला नाही. त्यामुळे कोयना धरणाची पाणी पातळी खालावली आहे. सध्या धरणामध्ये 11.74 टीएमसी म्हणजेच अवघे 11 टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. दररोज कोयना नदीला 1050 क्युसेक पाणी सिंचनासाठी सोडले जात आहे. कोयना धरण क्षेत्रात अत्यल्प प्रमाणात पाऊस झाला असल्याने जलसाठा वाढलेला नाही. याचा परिणाम कोयना जलविद्युत प्रकल्पावर झाला आहे.

105 टीएमसी पाण्यापैकी विद्युत निर्मितीसाठी 67 टीएमसी पाणी दरवर्षी वापरले जाते व उर्वरित पाणी सिंचनासाठी कोयना नदीमध्ये सोडण्यात येते. या वर्षीचा 67 टीएमसीचा कोटा संपला असताना नवीन जलवर्षात मात्र कोयना वीज प्रकल्पावर पाणी संकट ओढवले आहे. पाण्याअभावी कोयना वीज प्रकल्पाचा चौथा टप्पा पूर्णपणे ठप्प झाला असून येत्या काही दिवसांत जोरदार पाऊस होऊन धरणात पाणी साठा वाढला नाही तर पहिला, दुसरा व तिसरा टप्पादेखील ठप्प होण्याच्या मार्गावर आहे.

सद्य:स्थितीत कोयना वीज अवघी 100 ते 200 मेगावॅट वीजनिर्मिती केली जात आहे. एकीकडे वाढत्या उष्म्यामुळे वाढलेली विजेची मागणी आणि दुसरीकडे पाण्याअभावी ठप्प होणारा कोयना वीज प्रकल्प यामुळे नजीकच्या काळात पाऊस न झाल्यास भारनियमनाचे संकटदेखील ओढवणार आहे.

…तर पाणीटंचाईचा धोका

कोयना धरणातील पाण्याअभावी कोयना वीज प्रकल्प बंद होण्याच्या मार्गावर आहे. चौथा टप्पा बंद झाला असून उर्वरित टप्पेदेखील पाण्याअभावी बंद होण्याच्या मार्गावर आहेत. अशा परिस्थितीत चिपळूण परिसरात पाणीटंचाई उद्भवण्याचा मोठा धोका आहे. कोयनेच्या अवजलावर चिपळूण व वाशिष्ठी नदीलगतची गावे तसेच लोटे, गाणे-खडपोली, आरजीपीपीएल, खेर्डी येथील औद्योगिक वसाहती अवलंबून आहेत. जर वीजनिर्मिती पूर्णपणे ठप्प झाली तर मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जाण्याचा धोका आहे.

Back to top button