बेगाने शादी में अब्दुल्ला दीवाना : मुख्यमंत्री शिंदे | पुढारी

बेगाने शादी में अब्दुल्ला दीवाना : मुख्यमंत्री शिंदे

कराड; पुढारी वृत्तसेवा :  कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात विरोधकांकडून जल्लोष केला जात आहे. काही लोकांना दुसर्‍याचे घर जळताना आनंद होतो. मात्र ते स्वतःचे जळणारे घर वाचवू शकत नाहीत, असा उपरोधिक टोला लगावत नामोल्लेख टाळत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खा. संजय राऊत यांच्यासह विरोधकांचा नामोल्लेख टाळत विरोधकांची अवस्था ‘बेगाने शादी में अब्दुल्ला दीवाना’ अशी झाल्याची बोचरी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासन आपल्या दारी या योजनेचा शुभारंभ झाला. त्यानंतर कारखाना कार्यस्थळावरील
विश्रामगृहात उद्योग मंत्री उदय सामंत व राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या भूमिकेचा खरपूस समाचार घेतला.

कर्नाटक विधानसभेचा निकाल आमचा मित्रपक्ष असलेल्या भाजपाने स्विकारला आहे. महारष्ट्रात या निकालामुळे कोणताही फरक पडणार नाही. यापूर्वी काही राज्यातील निवडणुकीसह पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवारांचा पराभव झाला होता. मात्र त्यानंतरही लोकसभा निवडणुकीत भाजपासह मित्रपक्षांनी बाजी मारली होती. याकडे लक्ष वेधत एखाद्या निवडणुकीवरून आपण कधीही अनुमान बांधू शकत नाही. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू असतानाच त्रिपुरा, मेघालय यासह तीन राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने बाजी मारली होती. त्यामुळे एखाद्या निवडणुकीवरून देशावर त्याचा परिणाम होईल असे म्हणणे म्हणजे स्वतःची पाठ थोपटून घेण्यासारखे आहे. स्वतः स्वतःचे समाधान करून घेण्यासारखे असून या निवडणूक निकालाचा लोकसभा निवडणुकीवर परिणाम होणार नाही. त्याचबरोबर पुढील वर्षी होणार्‍या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपासह मित्रपक्षाचे सरकार सत्तेवर येणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर विरोधकांचा नामोल्लेख टाळत बेगानी शादी मे अब्दुला दिवाना अशी विरोधकांची अवस्था झाल्याचा उपरोधिक टोलाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावला.

Back to top button