सातारा : शाळेतील मुलींकडे चोरीचे मोबाईल; घरातही चोरी-छुपके वापर | पुढारी

सातारा : शाळेतील मुलींकडे चोरीचे मोबाईल; घरातही चोरी-छुपके वापर

सातारा : विठ्ठल हेंद्रे : साताऱ्यातील अल्पवयीन गुन्हेगारीने डोके वर काढले असताना त्याबाबत अनेक धक्कादायक माहिती समोर येवू लागली आहे. टवाळ पोरं शाळेतील मुलींना चोरीचे मोबाईल गिफ्ट देत असल्याची माहिती समोर येत आहे. साताऱ्यातील काही मुली शाळा प्रशासन व कुटुंबियांपासूनही चोरी-छुपके मोबाईल वापरत आहेत. दरम्यान, शाळा भरताना व शाळा सुटतानाही पालक व पोलिसांनी ‘वॉच’ ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.

सातारा शहरासह जिल्ह्यातील मुलं क्राईमच्या विळख्यात अडकत चालली आहेत. असे होवू नये यासाठी दैनिक ‘पुढारी’ ने अल्पवयीन गुन्हेगारी विरोधात भूमिका घेतली आहे. जिल्ह्यात अल्पवयीन गुन्हेगारीच्या वाढत चाललेल्या घटनांची इत्यंभूत माहिती समोर आणली जात आहे. टवाळ मुलांमुळे इतर मुलं बिघडू नयेत तसेच मुलींचेही नुकसान होवू नये, असा उद्देश यापाठीमागील आहे. शहरातील काही शाळांमधील मुली चोरून मोबाईल वापरत आहेत.

यासाठी सर्वप्रथम प्रत्येक पालकाने आपल्या मुला-मुलींचे दप्तर, सॅक घरातील अडगळीच्या जागा आठवड्यातून एकदातरी तपासाव्यात. शाळा प्रशासनाने मुलांच्या शाळांची दप्तरे चेक करावीत. तसेच पोलिसांनीही शाळा भरताना व सुटताना शाळा परिसरात थांबणाऱ्या टवाळखोर युवकांची झाडाझडती घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

ब्लॅक मास्क टोळी अन् दुकानांमध्ये ‘पे अॅन्ड पार्क मोबाईल’

मोबाईल चोरुन वापरत असलेल्या मुली शाळा भरण्यापूर्वी परिसरात असणाऱ्या दुकानांमध्ये मोबाईल ठेवत आहेत. मोबाईल ठेवताना व नंतर मोबाईल ताब्यात घेताना संबंधित मुली ब्लॅक मास्क वापरत आहेत. या मुलींनी टोळीच केलेली आहे. मोबाईल ठेवून घेण्यासाठी दुकानदारही १० ते २० रुपयांची रक्कम घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून मोबाईल वापरणाऱ्या मुलींची संख्या वाढतच चालली असून पे अॅन्ड पार्क पध्दतीने शाळा वेळेत मोबाईल सेफ राहत असल्याने मुली बिनधास्त आहेत.

पोलिसांनी धाडी टाकल्यास गुन्हे होतील ओपन

१. साताऱ्यात ज्या मुली शाळा कालावधीतही चोरून मोबाईल वापरत आहेत त्यांच्याकडील मोबाईल चोरीचे असण्याची शक्यता आहे.

२. हे मोबाईल त्यांच्या मित्रांनी त्यांना गिफ्ट दिलेले आहेत. बहुतेक मोबाईल महागडे असून ते चोरीचे असल्याची चर्चा आहे.
३. साताऱ्यात दररोज व प्रामुख्याने मंडई परिसरातून मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले आहे. पोलिस प्रशासनही केवळ गहाळ नोंद करून घेतात.
४. त्या मोबाईलचा किती शोध लागतो हा देखील संशोधनाचा विषय बनला आहे.
५. पोलिसांनी वॉच ठेवून शाळा परिसरात मोबाईल वापरणाऱ्या मुला-मुलींकडे चौकशी केल्यास अनेक चोऱ्यांचा छडा लागण्याची शक्यता आहे.

मुलं-मुली चोरून मोबाईल वापरत असतील तर ही गंभीर बाब आहे. यासाठी प्रत्येक पालकांनी, शाळा प्रशासनाने व वेळ प्रसंगी पोलिसांनी हस्तक्षेप करून वेळीच परिस्थिती हाताळावी. वेळोवेळी सांगूनही मुलं ऐकत नसतील तर मात्र कठोर भूमिका घ्यावी.               – अभिजित पिसाळ, पालक.

 

Back to top button