सातारा : बिबट्यांचा अधिवास आता जंगलातून उसाच्या फडात | पुढारी

सातारा : बिबट्यांचा अधिवास आता जंगलातून उसाच्या फडात

सातारा; महेंद्र खंदारे :  गेली दोन दशके बिबट्याने ऊस शेतीला आपले घर केले आहे आणि मादी बिबट्याने आता स्वत:त जनुकीय बदल घडवला आहे. गर्भ धारणा झाल्यावर गर्भातच पिलाला हे उसाचे रान आपले घर असल्याचे आई (मादी) आपल्या पिलांवर बिंबवते. त्यामुळे जरी या बिबट्यांना ऊस शेतीमधून पकडून जंगलात सोेडले तरी ते उसाच्या रानातच निवार्‍याला येत असल्याचे समोर आले आहे. कराडनंतर आता सातारा तालुक्याच्या काही भागात उसाच्या शेतात बिबट्यांची संख्या वाढल्योन दहशत निर्माण झाली आहे. यासाठी वन विभाग आणि नागरिकांनी अधिक सर्तक राहण्याची गरज आहे.

सध्या जिल्ह्यात गळीत हंगाम सुरू असल्याने जिल्ह्याच्या प्रत्येक भागात ऊसतोड सुरू आहे. ही ऊसतोड सुरू असतानाच मागील काही दिवसांत कराड वन परिक्षेत्रात जवळपास 15 बिबटे आढून आले. ऊसाच्या फडात सापडलेले बिबट्यांचे बछडे व त्यांच्या आईची भेट घडवून आणण्यात वन विभाग यशस्वी झाला. मात्र, आता हाच कित्ता सातारा तालुक्यातही घडू लागला आहे. गत काही महिन्यांपूर्वी सज्जनगड परिसरात एक बिबट्याचे पिल्लू आईपासून विलग झाले होते. त्याची भेट घडवून आणली होती. तर नागठाणे येथेही उसाच्या फडात दोन बिबटे आढळून आले होते. त्यामुळे कराडनंतर आता सातार्‍याकडे बिबट्यांचा अधिवास सरकू लागला आहे.

सातारा तालुक्यातही उसाची शेती मोठया प्रमाणात आहे. ज्यावेळी ऊस लावला जातो त्यावेळेपासूनच बिबटे त्या-त्या परिसात ठाण मांडतात. शेतकरी उसाला पाणी देताना थेट बांध ते बांध फिरत असतात. त्यामुळे रानात बिबट्या आहे की नाही याची माहिती मिळत नाही. मात्र, उसतोड सुरू झाल्यानंतर रान मोकळे होत जाते. त्यानंतर ऊसाच्या फडात बिबट्याचा अधिवास असल्याचे दिसून येत आहे. बिबट्यापासून मानवाला फारसा धोका नसला तरी बिबट्यासोबत जगणे माणसाला शिकावे लागणार आहे.

महाराष्ट्रात जुन्नर खालोखाल सर्वात जास्त बिबट्यांची संख्या सातारा जिल्ह्यात आहे. जवळ-जवळ 39 नवीन गावे आहेत जेथे बिबट्या आपले अस्तित्व वारंवार दाखवत आहे. ऊस शेती हे त्याच्या लपण्यासाठी, निवार्‍यासाठी पोषक आहे. आजच्या तारखेला सहयाद्री व्याघ्र प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर बिबट्यांची नोंद आहे. जेवढे बिबटे जंगलात आहेत त्यापेक्षा अधिक बिबटे हे जंगलाबाहेर असल्याने ही चिंतेची बाब आहे.

इतरत्र सोडल्यानंतरही बिबटे परतताहेत फडातच

मध्यंतरी 1998-99 या सालात जुन्नर येथे मोठा बिबट्यांचा व मानव असा संघर्ष सुरू झाला. तत्कालीन वनाधिकारी यांनी जवळपास 108 बिबटे त्या भागात पकडले व महाराष्ट्रात इतरत्र विविध जंगलात सोडले. त्यापैकी 16 बिबट हे कोयना चांदोलीच्या जंगलात सोडण्यात आले. सोडलेल्या बिबट्यास त्याच्या शेपटीमध्ये एक मायक्रो चीप लावून सोडण्यात आले (जेणे करून पुन्हा सापडल्यास त्याची ओळख पटावी) पण 16 पैकी 7 बिबट साधारण 3 ते 3.5 वर्षांनी पुन्हा जुन्नर भागात उपद्रव करताना पिंजर्‍यात सापडले होते.

पश्चिम महाराष्ट्रात ऊस शेती मोठ्या प्रमाणात आहे. ऊस शेतीच आता बिबट्यांचा अधिवास झाला आहे. त्यामुळे आपल्याला बिबट्यासह जगणे शिकले पाहिजे. जंगलाबाहेर बिबट्यांची संख्या वाढणे धोकादायक असून सरकारने यावर तत्काळ ठोस कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.
– रोहन भाटे, मानद वन्यजीव रक्षक

Back to top button