वणव्यांवर ठेवला जातोय सॅटेलाईट वॉच; सातार्‍यात वणवा लागला तरी थेट डेहराडूनला खबर | पुढारी

वणव्यांवर ठेवला जातोय सॅटेलाईट वॉच; सातार्‍यात वणवा लागला तरी थेट डेहराडूनला खबर

सातारा; पुढारी वृत्तसेवा : डिसेंबर महिना संपल्यानंतर बहुतांश ठिकाणी वणवे लागतात. पूर्वी वणवा लागल्यानंतर त्याची माहिती मिळण्यास उशीर होत असल्याने वणवा आटोक्यात आणण्यास वेळ लागत होता. मात्र, आता वणव्यांवर थेट सॅटेलाईटने वॉच ठेवला जात आहे. एका विशिष्ट प्रणालीद्वारे वणवा लागल्याचा संदेश थेट वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मोबाईलवर येतो. त्यानंतर संबंधित वनपाल व वनरक्षकांना याची माहिती देऊन पुढील कार्यवाही केली जाते. सॅटेलाईटचे नियंत्रण हे उत्तराखंडमधील डेहराडून येथून होते. या प्रणालीमुळे वणव्यावर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

उन्हाळा प्रारंभ झाला की जंगलात वणव्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. जंगलात आग लागल्यास ती परंपरागत पद्धतीने आटोक्यात आणली जाते. मात्र, उन्हाळ्यात जंगलात लागणारी आग ही त्वरेने पसरते. त्यामुळे काही तासांतच जंगल आगीने वेढले जाते. परंतु केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने देशभरातील जंगलात लागणार्‍या आगीवर नियंत्रण आणि उपाययोजना करण्यासाठी नवे सॅटेलाईट विकसित केले आहे. हे सॅटेलाईट डेहरादून येथून नियंत्रित केले जात असून जंगलात आग लागल्यास ती क्षणात संबंधित अधिकार्‍यांच्या मोबाईलवर येते. नेमकी ही आग कोणत्या वनखंडात लागली. गाव, परिसराचा नकाशा, क्षेत्रपरिसर आदी माहिती मुख्य वनसंरक्षक, उपवनसंरक्षकांना मिळते.

जंगलातील आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नवे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. त्यानुसार सॅटेलाईटद्वारे जंगलातील आग आटोक्यात आणता येणार आहे. सॅटेलाईटद्वारे जंगलातील आगीची माहिती वरिष्ठ वनाधिकार्‍यांना मिळावी, यासाठी त्यांची कनेक्टिव्हिटी मोबाईलने जोडण्यात आली आहे. यापूर्वी जंगलात आग लागल्यानंतर वरिष्ठ वनाधिकार्‍यांना त्या आगीची माहिती उशिराने मिळायची. आगीबाबत अधिकार्‍यांना वन कर्मचार्‍यांवर अवलंबून राहावे लागत होते. परंतु आता जंगलात आग लागल्यास हीमाहिती सर्वात प्रथम वरिष्ठ अधिकार्‍यांना माहित होते. त्यानंतर या आगीची माहिती वनपाल, वनरक्षकांपर्यंत पोहोचते.

ड्रोन अन् फायर ब्लोअरचा वापर

सॅटेलाईटच्या संदेशानुसार वणवा नेमक्या कोणत्या ठिकाणी लागला, याची माहिती मिळाल्यानंतर हा वणवा आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जातो. पूर्वी वणवा आटोक्यात आणण्यासाठी वाळू व पाण्याचा वापर केला जात होता. मात्र, मोठ्या प्रमाणात एखाद्या दुर्गम ठिकाणी वणवा लागल्यास तेथे हे साहित्य घेऊन तो वणवा आटोक्यात आणणे अवघड होते. त्यामुळे वन विभागाने नवीन यंत्रणेचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर ड्रोनने पाण्याची फवारणी करून वणवा आटोक्यात आणला जात आहे. तर बहुतांश ठिकाणी फायर ब्लोअर या यंत्राचा वापर केला जात आहे. यामधून हवा व पाणी वेगाने सोडून आग आटोक्यात आणली जाते.

सॅटेलाईटवरून येणार्‍या संदेशामध्ये अचूक माहिती मिळत असल्याने वणवा नक्की कोठे लागला आहे याची माहिती मिळते. त्यानुसार संबधित अधिकार्‍यांना माहिती दिल्यानंतर वणवा आटोक्यात आणला जात आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ड्रोन आणि फायर ब्लोअर या आधुनिक यंत्राचा सातारा जिल्ह्यात वापर वाढत आहे. त्यामुळे भविष्यात वणव्यांची संख्या घटत जाणार आहे.
– महादेव मोहिते, उपवनसंरक्षक

Back to top button