सातारा : शालेय सहलींना आजपासून ब्रेक | पुढारी

सातारा : शालेय सहलींना आजपासून ब्रेक

सातारा : पुढारी वृत्तसेवा : राज्यासह जिल्ह्यात विविध शाळा व विद्यालयांच्या शालेय सहलीच्या बसेसना दुर्घटना झाल्या. त्यामध्ये विद्यार्थ्यांसह शिक्षकांना गंभीर दुखापती झाल्या. तसेच दहावी व बारावीच्या परीक्षा तसेच अन्य वर्गाच्या चाचण्यांसह अन्य परीक्षा होणार असल्याने जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने शालेय सहलींना ब्रेक लावला आहे. शुक्रवार, दि. २० जानेवारीपासून कोणत्याही सहलींना परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली २ वर्षे शाळा व विद्यालयाच्या शैक्षणिक सहली गेल्या नव्हत्या. त्यामुळे यावर्षी शाळा व विद्यालयाच्या शैक्षणिक सहलींना नियम व अटीचे पालन करून जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागामार्फत परवानगी देण्यात आल्या होत्या. मात्र, गेल्या काही दिवसांत सहलीच्या बसेसना अपघात झाल्याच्या दुर्घटना घडल्या. त्यामध्ये शिक्षक व विद्यार्थी जखमी झाले. अशा घटना रोखण्यासाठी शिक्षण विभागाने गुरूवारी धडक निर्णय घेतला. दहावी व बारावी तसेच इतर वर्गाच्या परीक्षा सुरू होणार असल्याने दि. २० जानेवारीनंतर शैक्षणिक सहलींच्या प्रस्तावाला परवानगी देण्यात येणार नसल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी दिली,

सहलीची परवानगी मागणाऱ्यावर कारवाई

बऱ्याच शाळांनी सहल परवानगीसाठी माध्यमिक शिक्षण विभाग कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केले आहेत. शाळा व विद्यालयात परीक्षा सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शैक्षणिक सहलीसाठी परवानगीचे प्रस्ताव माध्यमिक शिक्षण विभागाकडे सादर करू नयेत. शैक्षणिक सहल परवानगी प्रस्ताव कार्यालयास सादर केल्यास त्याबाबत कोणतीही कार्यवाही केली जाणार नाही. याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक, प्राचार्याच्यांवर निश्चित करून प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असे माध्यमिक शिक्षण विभागाने काढलेल्या पत्रात म्हटले आहे.

Back to top button