सातारा : महाबळेश्वरमध्ये पुन्हा हिमकणांचा गालिचा | पुढारी

सातारा : महाबळेश्वरमध्ये पुन्हा हिमकणांचा गालिचा

महाबळेश्वर; पुढारी वृत्तसेवा :  थंडीचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या महाबळेश्वर पर्यटनस्थळी गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. तापमानात घसरण झाल्याने कडाक्याची थंडी महाबळेश्वरची नजाकत दाखवून देत आहे. कडाक्याच्या थंडीसोबतच गार वार्‍यामुळे स्थानिकांसह पर्यटक महाबळेश्वरमध्ये ‘काश्मीर’चाच अनुभव घेत आहेत. शनिवारी पहाटे लिंगमळा परिसरातील स्मृतिवनात दवबिंदूचे हिमकणात रूपांतरण झाल्याचे द़ृश्य आज पुन्हा एकदा पाहावयास मिळाले. सर्वत्र हिमकणांचा गालिचाच पसरल्याचा भास झाला.

महाबळेश्वरमधील तापमानात चांगलीच घसरण झाल्यामुळे दवबिंदू गोठून त्याचे हिमकणात रूपांतर झाले आहे. यंदाच्या हंगामात प्रथमच हिमकण पडल्याने त्याचा आनंद पर्यटक घेत आहे. कडाक्याची थंडी व गार वार्‍यांमुळे महाबळेश्वर शहर परिसरात तापमानाचा पारा हा 6 ते 7 अंशावर आला आहे. थंडीमुळे पर्यटक मुख्य बाजारपेठेत शाल, स्वेटर, कानटोपी परिधान करून फेरफटका मारताना दिसून येत आहेत. महाबळेश्वर सोडून 15 ते 20कि.मी. खाली गेल्यावर असणारी बोचरी थंडी व महाबळेश्वरमध्ये असणारी गुलाबी थंडी यातील फरक पर्यटक अनुभवत आहेत. शहरातील तापमानामध्ये सतत चढ उतार होत असून गेल्या दोन तीन दिवसांपासून थंडीमध्ये मोठी वाढ झाली आहे.

शहरात शनिवारी दिवसभर थंडी जाणवत होती तर सायंकाळनंतर शहरासह वेण्णालेक व लिंगमळा परिसरातील स्मृतीवनात तर झाड झुडपांवर पुन्हा एकदा हिमकण दिसून आले. या परिसरात सर्वत्र हिमकणांचा जणू काही गालिचा पसरल्याचा भास पर्यटकांना झाला. त्यामुळे या थंडीतही हिमकणांचा पर्यटकांनी आनंद घेतला. झाडांच्या पानांसह वाहनांच्या टपांवरही हिमकण पडले होते.

भौगोलिकदृष्ट्या विचार केल्यास शहरातील इमारती, उष्णता, झाडी या गोष्टी दवबिंदू गोठण्यासाठी पूरक नसतात. मात्र, वेण्णालेक परिसरामधील भौगोलिक परिस्थिती वेगळी असून मोकळी जागा, शेती व लोकवस्तीचे प्रमाण कमी असल्याने दवबिंदू गोठण्यास अनुकूल वातावरण असल्यानेच हिमकण पडत आहेत.

Back to top button