संजय राऊतांनी वाचाळ बडबड बंद करावी : शंभूराज देसाई | पुढारी

संजय राऊतांनी वाचाळ बडबड बंद करावी : शंभूराज देसाई

सातारा, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नावरून संजय राऊत हे बडबड करत आहेत. राऊत जे शब्द वापरतात, त्याकडे पाहिले तर राज्यातील शांतता परिस्थिती विचलित करण्याचे व बिघडवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जशी 40 दिवस जेल झाली, तशी सीमाप्रश्नी तुम्हाला 4 दिवस तरी जेल झाली का? असा प्रश्न उपस्थित करून जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी संजय राऊत यांनी वाचाळ बडबड बंद करावी, अशा शब्दांत खरपूस समाचार घेतला. दरम्यान, राऊतांना धमकीचे फोन आले हे सांगण्यास चोवीस तास का लागले?, असा प्रश्नही त्यांनी केला.

सातारा येथील कोयना दौलत या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत ना. शंभूराज देसाई यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले.ते म्हणाले, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात केंद्र सरकारने लक्ष घालून सामंजस्याने दोन्ही राज्यांची बैठक घेऊन तोडगा काढण्याची भूमिका घेतली आहे. आमचा कर्नाटक दौरा पुढे गेल्यानंतर राज्यातील राजकीय, सामाजिक वातावरण गढूळ करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न काही लोक करत आहेत. विशेषतः ठाकरे गटाचे प्रवक्ते खा. संजय राऊत जे शब्द वापरतात, त्याकडे पाहिले तर राज्यातील शांतता परिस्थिती विचलित करण्याचे व बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत.

राऊत हे साडेतीन महिने आराम करून बाहेर आले आहेत. पुन्हा सक्रिय असल्याचे दाखवण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरु आहे. राऊतांना समज नोटीस आल्यानंतर ते बेळगावमध्ये हल्ले होणार, अटक होणार याची भीती वाटत असल्याने तिकडे गेले नाहीत. मग, तुम्ही दुसर्‍याला षंढ कसे म्हणता? संजय राऊत बोलतात मी डरपोक असतो तर जेलमध्ये गेलो नसतो पण ते पत्रा चाळीतील आर्थिक घोटाळ्यामुळे जेलमध्ये गेले होते. राऊत तुम्ही निर्दोष सुटला नसून वारंवार छाती बडवू नका. गोरगरीब लोकांच्या पत्राचाळीत जो अपहार झाला त्यासाठी तुम्ही जेलमध्ये गेला होता, समाज हिताच्या कामासाठी नाही.

मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी सीमाप्रश्नी काय केले? असे राऊत बोलतात पण मुख्यमंत्री शिंदे यांना सीमाप्रश्नी 40 दिवस जेल झाली होती. तशी सीमा प्रश्नी तुम्हाला 4 दिवस तरी जेल झाली का? अजित पवार यांनी छगन भुजबळ हे वेशांतर करून गेले असे सांगितले. पण त्यावेळी भुजबळ व मुख्यमंत्री शिंदे हे दोघेही शिवसेनेत होते. त्यावेळी भुजबळ यांची एक तुकडी पुढे गेली होती. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे बेळगावला गेले. त्यांना सीमाप्रश्नी जेल झाली होती. संजय राऊत यांनी त्यांची वाचाळ बडबड बंद करावी, साडेतीन महिने महाराष्ट्र शांत होता. तुम्ही फक्त तुमच्या पक्षाची भूमिका मांडा. कोणाच्या भावना दुखावतील, असे वक्तव्य करु नका. दोन्ही राज्यात शांतता राहील अशी भूमिका केंद्र सरकार घेत असल्याचे ना. देसाई यांनी सांगितले.

काही जण वेगवेगळ्या भागात आपली मते मांडत राज्यातून बाहेर पडण्याचा निर्णय व्यक्त करत आहेत. यावर बोलताना ना. देसाई म्हणाले, ज्याठिकाणी अशी मते व्यक्त केली, त्यानंतर आमच्या लोकप्रतिनिधींनी त्यांच्या भेटी घेतल्या आहेत. त्यावर त्यांनी आम्हाला महाराष्ट्र सोडून कोठेही जायचे नाही, अशी भूमिका घेतली आहे. सीमाभागातील लोकांना सुविधा देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे ना. शंभूराज देसाई यांनी सांगितले.

संघर्ष मिटणार हे पवारांनासुद्धा माहिती असावं…

खा. शरद पवार यांनी कर्नाटकमध्ये जाण्याचा इशारा दिला होता, यावर बोलताना ना. शंभूराज देसाई म्हणाले, खा. शरद पवार यांनासुद्धा कदाचित माहिती झालं असावं की, सध्याचा सीमावादावरील संघर्ष एका दिवसात मिटणार आहे, वाढणार नाही. या वयात त्यांनी तिथं जावे अशा प्रकारची भूमिका राज्य सरकारची कधीच नसेल. आम्ही हे वातावरण शांत करण्यासाठी प्रयत्न करत आहोत.

Back to top button