सातारा : शिवरायांचा अवमान म्हणजे सर्वांचा अपमान – खा. उदयनराजे | पुढारी

सातारा : शिवरायांचा अवमान म्हणजे सर्वांचा अपमान - खा. उदयनराजे

नाते; इलियास ढोकले :  छत्रपती शिवरायांचा अवमान म्हणजे आपल्या सर्वांचा अपमान असल्याची भावना खा. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त करून छत्रपती शिवाजी महाराज यांचा सातत्याने अपमान करणार्‍या राज्यपालांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे, अशी गर्जना किल्ले रायगड येथे आयोजित ‘निर्धार शिवसन्मानाचा’ मेळाव्यात केली.
किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला शनिवारी अभिवादन केल्यानंतर तेथे मेळाव्यास मोठ्या प्रमाणात जमलेल्या शिवप्रेमींशी संवाद साधताना खा. उदयनराजे बोलत होते.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करताना, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची तुलना थेट शिवरायांशी केली. त्यानंतर शिवभक्त आक्रमक झाले आहेत. खा. उदयनराजे यांनी शनिवारी रायगडावर ‘निर्धार शिवसन्मानाचा’ मेळावा घेतला. त्यांच्या या मेळाव्याला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पाठिंबा दिला असल्याने राज्यपाल यांच्या विरोधात धार अधिक तीव्र झाली आहे.

खा. उदयनराजे म्हणाले, सर्वधर्मसमभावाच्या व्याख्येत बदल केला जात आहे. स्वार्थी लोकांमुळे महासत्ता नाही तर देशाचे महातुकडे झाल्याशिवाय राहणार नाहीत. शिवाजी महाराजांचा आदर्श, सर्वधर्मसमभावाचा विचार घेतला नाही तर देशाची वाताहत झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक राजकीय पक्ष स्वार्थी झाला आहे. गप्प बसणारे राज्यपालांएवढेच दोषी आहेत, असा हल्लाबोल खा. उदयनराजे यांनी राज्यपालांवर केला. शिवरायांच्या सन्मानासाठी निव्वळ घोषणा करून चालणार नाही तर आता कृती केली पाहिजे. त्यामुळे मुंबईतील आझाद मैदानात सर्वांनी एकत्र या, असे आवाहनही खा. उदयनराजे यांनी केले.

उदयनराजे पुढे म्हणाले, शिवरायांनी जुलमी राजवट मोडून काढली. पण प्रत्येक जाती-धर्माचा मान राखण्याची शिकवण देणार्‍या शिवरायांचा अपमान होत आहे. त्याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवरायांचा अवमान होत असेल तर आम्ही शांत बसणार नाही. आपल्याला शिवरायांच्या विचारांचा विसर पडलाय. देशाचे राष्ट्रपती हे सर्वोच्च पद आहे. तसे राज्यात राज्यपाल सर्वोच्च पद आहे. पद मोठे आहे, पण पदावर असणार्‍याचे नाव घेऊन त्याला मोठे करायचे नाही. शिवरायांचा अपमान म्हणजे आपल्या सर्वांचा अपमान आहे, असे त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले.

मुंबईतील आझाद मैदानात एकत्र येण्यासाठी लवकरच तारीख जाहीर केली जाईल. अपमान करणार्‍यांविरुद्ध ठोस पावले उचलायला हवीत. शिवरायांचा अपमान करायला लाज वाटत नाही का? असा सवाल करून खा. उदयनराजे यांनी अपमान करणार्‍यांविरुद्ध आवाज उठवू. निव्वळ घोषणा करून चालणार नाहीत, तर आता कृतीही केली पाहीजे. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची बांधणी केली तशी महाराष्ट्रभर जाऊन पुन्हा आपल्याला बांधणी करायची आहे. यासाठी तयार राहा, असे आवाहनही त्यांनी अखेरीस केले.

Back to top button