सातारा : कर्नाटकातील शालेय सहलीच्या बसला अपघात; विद्यार्थी बचावले | पुढारी

सातारा : कर्नाटकातील शालेय सहलीच्या बसला अपघात; विद्यार्थी बचावले

केळघर/पाचगणी; पुढारी वृत्तसेवा : देव तारी त्याला कोण मारी, या म्हणीचा प्रत्यय नुकताच आला. काळ्या कड्याजवळ मंगळवारी कर्नाटक राज्यातील संकेश्वर आगाराच्या प्रवासी बसचा ब्रेक फेल झाला. मात्र, चालकाने प्रसंगावधान दाखवून गियर आपरेट करत वेगावर नियंत्रण करत बस डोंगराच्या बाजूला नेऊन थांबवली. यामुळे मोठी दुर्घटना टळली त्याचबरोबर विद्यार्थी व शिक्षकांचा जीवही भांड्यात पडला.

कर्नाटक राज्यातील संकेश्वर आगाराची बस क्र.के. ए. 23 एफ. 1085 ही सहलीची बस मंगळवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास सातार्‍याकडे निघाली असता केळघर घाटात अचानक बसचे ब्रेक फेल झाल्याचे चालक परशुराम तलवार यांच्या लक्षात आले. या बसमधून 56विद्यार्थी व चार शिक्षक प्रवास करत होते. ब्रेक फेल झाल्याने प्रसंगावधान राखत चालकाने विरुद्ध दिशेला बस नेऊन डोंगराच्या बाजूला थांबवली. या घटनेनंतर सहाय्यक वाहतूक अधीक्षक निलप्रभा पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.

बाका प्रसंग आला पण

केळघर घाटातील अवघड वळणे संपल्यानंतर अचानक एका अवघड वळणावर चालकाने एसटीचा ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो ब्रेक लागलाच नाही. पुन्हा पुन्हा बसचा चालक ब्रेक दाबत होता. चालकाच्या लक्षात आले की, एसटीचा ब्रेक फेल झाला आहे. पुढे अवघड वळण आहे, तीव्र उतारावर असलेली बस थांबवणार कशी हा प्रश्न चालकासमोर उभा राहिला. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखत गिअर ऑपरेट करुन बसवर नियंत्रण मिळवले.

हेही वाचा 

Back to top button