Raj Thackeray : मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार : राज ठाकरे | पुढारी

Raj Thackeray : मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार : राज ठाकरे

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : कोकण दौऱ्याला बुधवारी (दि.३०) सुरूवात करत आहे. कोकण दौरा झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज (दि.२९) येथे पुन्हा एकदा स्पष्ट केले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

मुंबईतील मनसेच्या मेळाव्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेचा खुलासा करताना राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले की, कोरोना काळातील त्यांच्या प्रकृतीची मी चेष्टा केली नव्हती, तर त्यावेळेच्या परिस्थितीबद्दल मी बोललो होतो. मुख्यमंत्री पद गेल्यानंतर आता उद्धव ठाकरे व्यवस्थित झालेले आहेत. आता कसे त्यांनी दौरे सुरू केले आहेत. सत्ता गेल्यानंतर दौरे आणि भेटी कशा सुरू झाल्या? असा सवाल राज ठाकरे यांनी यावेळी केला. काहींना पद मिळते, पण पोहोच मिळत नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना लगावला.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे म्हणाले की, राज्यपालांबद्दल काय बोलावं, हेच कळत नाही. राज्यपालांना कोण स्क्रीप्ट देते, हे पाहावे लागेल. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी ऱाष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केली होती, यावर अशी विधाने प्रसिद्धीसाठी केली जात असल्याची प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली.

मूळ प्रश्नांवरून लक्ष भरकटविण्यासाठी सीमावादाचा मुद्दा काढला जातो. सीमा प्रश्न अचानक कसा समोर येतो, हा एक प्रश्न आहे. सीमाप्रश्न न्यायालयात आहे. यावर न्यायालय निर्णय देईल. पण मूळ प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी असले प्रश्न समोर आणले जाते, असे राज ठाकरे म्हणाले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button