सातारा : आमचा गाव; खातुय देशात ‘भाव’ | पुढारी

सातारा : आमचा गाव; खातुय देशात ‘भाव’

सातारा;  प्रवीण शिंगटे :  सातारा जिल्हा म्हणजे शुरांची आणि वीरांची कर्मभूमी. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि युगपुरुष म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते त्या थोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा सातारा जिल्हा. समाजकारण, राजकारण, शिक्षण, कृषी, सहकार, उद्योग, सांस्कृतिक कार्य अशा विविध क्षेत्रासह शासकीय योजनांमध्ये कर्तृत्वाची बहुविध शिखरे पादाक्रांत करणार्‍या या जिल्ह्यातील अनेक गावांची आगळीवेगळी ओळख आहे. या वैशिष्ट्यपूर्ण गावांनी सातार्‍याचा नावलौकिक अटकेपार नेला असून अवघ्या देशात सातारा ‘भाव’ खाऊन जात आहे.

उज्ज्वल परंपरा, देदिप्यमान इतिहास आणि थोर पराक्रमाची पार्श्वभूमी लाभलेल्या सातारा जिल्ह्याच्या कर्तृत्वाचा डंका आता सर्वदूर पोहचला आहे. मराठी साम्राज्याची एकेकाळी राजधानी असलेला सातारा जिल्हा नैसर्गिक सौंदर्याचे वरदान लाभलेल्या सह्याद्रीच्या कुशीत वसला आहे. समाजकारण, राजकारण, शिक्षण, कृषि, सहकार, उद्योग, सांस्कृतिक कार्य अशा विविध क्षेत्रामध्ये जिल्ह्याने ठसा उमटवला आहे. क्रांतीकारकांचा जिल्हा म्हणूनही तो प्रसिध्द आहे. विविध क्षेत्रामध्ये सातारा जिल्ह्याने स्वत:चे असे एक आगळे वेगळे स्थान निर्माण केले आहे. इतिहासाच्या पाऊलखुणाबरोबरच ऐतिहासिक मोलाचा वारसा जतन करणार्‍या इथल्या मातील सेनादलात मर्दमुखी गाजवणार्‍या थोर आणि शूर शिलेदारांनीही जन्म घेतला हे या जिल्ह्याचे भाग्यच म्हणावे लागेल.

नैसर्गिक सौंदर्याचे आकर्षक वरदान लाभलेली अनेक पर्यटनस्थळे, पराक्रमाची आठवण करून देणारी ऐतिहासिक स्थळे, जिल्हाभर विखुरलेली आणि आध्यामिकतेचा संदेश देणारी इथली धार्मिक स्थळे, जागतिक वारसा स्थळाचे कोंदण लाभलेली रमणीय ठिकाणे, इथल्या जत्रा, यात्रा, सण आणि उत्सवाची वैभवशाली परंपरा या जिल्ह्याने सांभाळली आहे. तसेच आता सातारा जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण गावांचा डंका राज्यात अन् देशातही वाजला आहे. मधाचे गाव मांघर, डिजिटल गाव पिंपळी, पुस्तकांचे गाव भिलार, सैनिकांचे गाव अपशिंगे मि., फुलपाखरांचे गाव महादरे, खिलार गायीचे गाव मांघर, स्ट्रॉबेरीचे गाव भिलार, फुलांचे गाव कास, ट्रॅक्टरचे गाव मिरढे अशा गावांनी राज्यासह देशभर लौकिक मिळवला आहे. नानाविध वैशिष्ठ्ये जोपासणारी ही गावेच आता या जिल्ह्याचा नवा चेहरा बनली आहेत.

भिलार : देशातील पहिले पुस्तकांचे गाव

 पाचगणी ते महाबळेश्वर रस्त्यावरील पाचगणीपासून सुमारे 5 कि. मी. अंतरावर असलेल्या भिलारमध्ये ‘पुस्तकांचे गाव’ ही संकल्पना महाराष्ट्र शासनाने साकारली आहे. गावात प्रवेश करताच तेथील घरांच्या भिंतीवर चितारण्यात आलेली चित्रेच येणार्‍यांशी संवाद साधतात. इथे या, पुस्तके हाताळा, वाचा अन् तेदेखील अगदी मोफत. थोडी थोडकी नव्हे तर सुमारे 12 ते 15 हजार पुस्तके एकाचवेळी वाचायला मिळतात. या पुस्तकांची व्यवस्था त्यांच्या त्यांच्या साहित्य प्रकारानुसार गावातील वेगवेगळ्या 25 ठिकाणी केली आहे.

Back to top button