सातारा : महाबळेश्वरचा पारा घसरला; वेण्णा लेक परिसरात पारा 6 अंशावर | पुढारी

सातारा : महाबळेश्वरचा पारा घसरला; वेण्णा लेक परिसरात पारा 6 अंशावर

महाबळेश्वर;  पुढारी वृत्तसेवा :  थंडीचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये आता थंडीचा जोर वाढू लागला आहे. दिवसेंदिवस तापमानात घसरण होऊ लागल्याने हुडहुडी भरत आहे. वेण्णालेक परिसराचा पारा 6 अंशावर आला असून, शहरात किमान 10.6 अंश तापमानाची नोंद झाली आहे.

महाबळेश्वर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला असून, येथील प्रसिद्ध वेण्णा लेक परिसर व लिंगमळा परिसरात गारठ्याचे प्रमाण अधिक जाणवत आहे. तापमान घसरल्याने वेण्णालेक परिसरात पहाटे धुक्याची दुलई निर्माण होत आहे.
सध्या थंडीच्या प्रमाणात वाढ झाल्याने सकाळी वेण्णालेकवर पर्यटक अपवादानेच फिरकत आहेत. कडाक्याची थंडी ही महाबळेश्वरची नजाकत दाखवत असून या थंडीमुळेच निसर्गाची विविध आकर्षक रूपे व सृष्टीसौंदर्य पहायला मिळते.

महाबळेश्वर सोडून काही किमी अंतर गेल्यावर हुडहुडी भरवणारी थंडी असते. तर, महाबळेश्वरमध्ये त्यात थोडी गुलाबी थंडीची नजाकत जाणवते. हा फरक पर्यटक अनुभवत आहेत. सध्या थंडीचा जोर वाढल्याने पर्यटकांसह स्थानिकदेखील स्वेटर,कानटोपी,जॅकेट्सचा आधार घेत आहेत. लिंगमळासह शहरातील विविध भागांमध्ये स्थानिकांसह पर्यटकही शेकोटी पेटवून शेकताना पहावयास मिळत आहेत.

Back to top button