सातारा : जन्मदात्या बापानेच तरुणाला साखळीने डांबले; गोंदवले खुर्द येथील प्रकार | पुढारी

सातारा : जन्मदात्या बापानेच तरुणाला साखळीने डांबले; गोंदवले खुर्द येथील प्रकार

वरकुटे मलवडी : पुढारी वृत्तसेवा : माण तालुक्यातील गोंदवले खुर्द येथील एका 22 वर्षीय मनोरुग्ण तरुणाला जन्मदात्या बापाने घरातून बाहेर काढून माळरानावर एका झोपडीत गेल्या दीड वर्षांपासून साखळीला कुलूप लावून बांधून डांबून ठेवले आहे. गेल्या दिड वर्षापासून उन, वारा व पाऊस त्याचबरोबर ना उजेड ना वेळेवर अन्न, पाणी अशा परिस्थितीत हा तरुण मरण यातना भोगत आहे. त्यांच्या सुटकेसाठी ग्रामस्थांचे प्रयत्न सुरु आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, माण तालुक्यातील गोंदवले खुर्द येथे गेल्या काही वर्षांपासून 22 वर्षीय रामा रमेश शिंदे हा मगोरुग्ण तरुण फिरत होता. मेंदूवर कोणताही ताबा नसल्याने त्याचे मानसिक संतुलन पूर्णपणे बिघडले होते. अशा परिस्थितीत तो गावातील हॉटेल, किराणा दुकान, बाजारातील भाजी पाल्याचे व्यापारी तसेच स्थानिक ग्रामस्थांना त्रास देत होता. लोक जे देतील तो खायचा पण हाताने उचलून नासधुस मोठ्या प्रमाणात करायचा.

ऊन, वारा पावसात म्हसवड ते सातारा राज्यमहामार्ग व गावातील काही रस्त्यावर फिरून मिळेल, त्या ठिकाणी आसरा घेत असे. आपल्याच धुंदीत कुठलेही भान नसल्याने सैरभैरपणे फिरणे हा त्याचा नित्याचा दिनक्रम ठरलेला. पण कुंटुंबाला व ग्रामस्थांना त्याचा त्रास अधिक होवू लागल्याने गेल्या दिड वर्षांपासून जन्मदात्या बापाने गावापासून तीन किलोमीटर अंतरावर स्वतःच्या शेतात एका झोपडीत पायाला साखळीला कुलूप लावून बांधून ठेवले आहे. त्या झोपडीच्या अवतीभवती काटेरी झाडाच्या फांद्यांनी कुंपण केले आहे.

सध्या त्या झोपडी भवती काटेरी झुडपे, गवत वाढले आहे. लाईटची कोणतीही सोय नाही. झोपडी सुध्दा गळकीच आहे. ऊन, वारा व पाऊस त्याच ठिकाणी आहे. अशा अवस्थेत हा मनोरुग्ण तरुण राहत आहे. झोपणे, उठणे, बसणे व प्रांत विधी एकाच ठिकाणी असल्याने त्याच दुर्गंधीत गेल्या काही दिवसांपासून त्याचे वास्तव्य आहे.

कधी वेळेवर अन्न पाणी मिळतही नाही, अशा अवस्थेत तो मरण यातना भोगत आहे. मानवतेच्या या युगात वेडसर असलेल्या 22 वर्षीय मनोरुग्ण तरुणाला चांगले उपचार मिळावे, इतरांप्रमाणे त्यालाही मानवी जीवन जगण्याचा आनंद प्राप्त व्हावा, या उदात्त हेतूने गावातील माजी सरपंच अर्जून शेंडगे, शंकर जाधव, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दिपक पोळ, आप्पा कदम, अमोल वायदंडे, दिनकर अवघडे, सचिन तुपे यांनी दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्याशी संपर्क साधत या तरुणाबाबतची माहिती दिली. या मनोरुग्ण तरुणाला ताब्यात घेऊन पुढील उपचारासाठी पाठवण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

Back to top button