सातारा : जिल्ह्यातील 202 पाणीपुरवठा योजना सोलरवर; 83 गावांचा समावेश | पुढारी

सातारा : जिल्ह्यातील 202 पाणीपुरवठा योजना सोलरवर; 83 गावांचा समावेश

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  जल जीवन मिशन योजनेंतर्गत सातारा जिल्हा राज्यात अग्रेसर राहिला आहे. सध्या सर्वत्र वीज बचतीचा जागर सुरू आहे. त्यामध्ये सातारा जिल्हा परिषदही मागे नाही. गावोगावी आता सुमारे 202 हून अधिक योजना आता सौर ऊर्जेवर चालणार असल्याने गावोगावच्या वीज बिलांचा प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे.

ग्रामीण भागामध्ये पिण्याचे शुद्ध व पुरेसे पाणी उपलब्ध होण्याच्या उद्देशाने गावागावात प्रत्येक घरात नळ जोडणी उपलब्ध करण्यासाठी केंद्र शासनाने जलजीवन मिशन हाती घेतले आहे. या योजनेतील कामासाठी केंद्र व राज्य शासनाचा प्रत्येकी 50 टक्के हिस्सा आहे. त्यानुसार गावोगावी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत ग्रामीण भागात तर शहरी भागात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू आहेत. तसेच 2024 पर्यंत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळजोडणी करून पाणीपुरवठा करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

या योजनांसाठी सुरुवातीला वीज बिलाचा मोठा अडथळा होता. आधीच गावच्या पथदिव्यांची वीज बिले थकल्याने महावितरणने अनेक गावांची वीज जोडणी तोडली होती. त्यामुळे ग्रामपंचायतींना महावितरणची वीज बिले भरणे जिकरीचे झाले आहे. दिवसेंदिवस वीज बिलांचे दर वाढत चालले आहेत. त्यामुळे वीज बिल भागवणे शक्य होत नाही.

यावर पर्याय म्हणून सौरऊर्जेचा वापर हा उत्तम पर्याय ठरू शकतो म्हणून सौरऊर्जेचे रुपांतर विद्युत ऊर्जेत करून वीज बिल वितरण कंपनीस नेट मीटरद्वारे देणे शक्य होणार आहे. याबदल्यात ज्या प्रमाणात सोलर पॅनलद्वारे वीज निर्मिती होणार आहे. त्या प्रमाणात ग्रामपंचायतीस देय असणार्‍या वीज बिलातून सोलर पॅनलद्वारे निर्माण होणार्‍या विद्युत युनिटनुसार सरसकट वीज बिलातून कपात झाल्याने ग्रामपंचायतीस आर्थिक भार सोसावा लागणार नाही. यासाठी ग्रामपंचायतीस वीज बिलात होणार्‍या लाभाच्या बदल्यात इतर विकास कामे करणे सोयीचे होणार आहे. योजनेतील बहुतांशी योजना सौरऊर्जेवर चालणार असल्याने वीज बिलांचा अडथळा दूर होणार आहे.

योजनेसाठी 7 कोटी 93 लाख मंजूर

जिल्ह्यातील 83 गावांमधील 202 पाणीपुरवठा योजना सोलर पॅनलवर चालणार आहेत. कराड तालुक्यातील 41, कोरेगाव 14, खंडाळा 10, खटाव 24, पाटण 20, फलटण 30, माण 8, वाई 44, महाबळेश्वर 4, जावली 2, सातारा 5 या योजनांचा समावेश आहे. त्यासाठी 7 कोटी 93 लाख 59 हजार 812 रुपये मंजूर करण्यात आले आहेत. 83 गावांचा आराखडा मंजूर असून 119 गावांचे आराखडे अद्याप प्राप्त झाले नाहीत. सध्या जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 25 कामे प्रस्तावित आहेत.

Back to top button