सातारा : शाळा परिसरामध्ये ‘कोटपा’ फाट्यावर; टपर्‍यांमधून चोरी छुपे विक्री | पुढारी

सातारा : शाळा परिसरामध्ये ‘कोटपा’ फाट्यावर; टपर्‍यांमधून चोरी छुपे विक्री

सातारा; मीना शिंदे :  तरुणाईमध्ये वाढत्या व्यसनाधीनता आळा घालण्यासाठी शाळा परिसरातील 100 मीटर परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदाथार्ंंची खरेदी-विक्री बंदीसाठी यलो लाईन उपक्रम राबवण्यात आला होता. मात्र, कोरोनापश्चात या यलो लाईनला शाळा व्यवस्थापनांनी कोलदांडा दिला आहे. शाळा परिसरांमध्ये अशा टपर्‍या दिसू लागल्या असून त्यामध्ये तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत आहे. त्यामुळे केंद्राच्या तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ कायदा अर्थात ‘कोटपा’ फाट्यावर बसला जात आहे.

राज्यात 18 वर्षाखालील मुले व 18 वर्षावरील व्यक्तींना तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन लागू नये. यासाठी केंद्र सरकारने तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ कायदा 2003 अर्थातच कोटपा निर्माण केला. या कायद्यानुसार शैक्षणिक संस्थांच्या 100 यार्ड परिसरामध्ये तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, उत्पादन, वितरण, साठवण करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्यामुळे केंद्राच्या तंबाखूमुक्त शैक्षणिक धोरणांतर्गत सर्व शैक्षणिक संस्थांच्या परिसरातील 100 यार्ड अंतरामध्ये पिवळी रेषा ओढण्यात यावी, असे परिपत्रकच शिक्षण विभागाने काढले होते.

जिल्ह्यातही या परिपत्रकाची अंमलबजावणी काही प्रमाणावर करण्यात आली. मात्र, काही शाळांनी या अंमलबजावणीला फाटा दिला होता. त्यामध्ये खाजगी शाळांची संख्या अधिक होती. त्यानंतर काहीच दिवसांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाला अन् शाळा व्यवस्थापनांना यलो लाईनचा जणू विसरच पडला आहे. त्यानंतर यलो लाईनला कोलदांडाच दिला आहे.

कोरोना काळात अनेकांचे रोजगार गेल्यामुळे अनेकांनी छोट्या व्यवसायांचा आधार घेतला. यातूनच फूटपाथ आणि मोक्याच्या ठिकाणी टपर्‍यांचे पेवच फुटले आहे. यामधून शाळा महाविद्यालय परिसरही सुटले नाहीत. कोटपा कायदा फाट्यावर बसवून शाळा परिसरांमधील टपर्‍यांमध्ये गोळ्या बिस्कीटाच्या नावाखाली चोरी छुपे गुटखा, सिगारेटसारख्या तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत आहे. बर्‍याचदा परिसरातील शैक्षणिक संस्थांना याबाबत माहिती असूनही दूरलक्ष केले जात आहे. त्यातून भावी पिढी व्यसनाधीनतेच्या मार्गावर जात आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरुळीतपणे सुरु झाले असल्याने यलो लाईन उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होण्याची गरज निर्माण झाली आहे.

शैक्षणिक साहित्यातूनही नशेची झिंग

बदलत्या काळानुसार व्यसनांचे प्रकारही बदलले आहेत. तंबाखू, सिगारेट, मद्य याबरोबरीने व्हाईटनरसारख्या शैक्षणिक साहित्यातूनही नशेची झिंग चढवली जात आहे. बर्‍याचदा प्रयोग शाळेतील काही रासायनिक घटकांचाही विद्यार्थ्यांकडून नशेसाठी वापर केला जात आहे. काही मुलांना भाजलेली माती खाण्याची सवय असते. अशा मुलांकडून पाटीवरील पेन्सीलही खाल्ली जात आहे. त्याचबरोबर विविध फ्लेवरच्या पेन हुगण्याची सवय अनेक मुलांमध्ये दिसून येत आहे.

आपल्या समाजात तंबाखू खाण्याची सुरुवात करण्याचे वय हे 10 वर्षांपर्यंत खाली आले आहे त्यामुळे शालेय जीवनापासूनच तंबाखू विषयी प्रबोधन आणि त्या विषयी कायद्याची कठोर अंमलबजावणी अत्यंत आवश्यक आहे. तबाखुमुक्त शाळा हे अभियान शाळांनी जोमाने राबवणे आवश्यक आहे.
डॉ. हमीद दाभोळकर, परिवर्तन व्यसनमुक्त संस्था.

Back to top button