सातारा : कोयना धरण दरवाजे साडेतीन फुटांवर | पुढारी

सातारा : कोयना धरण दरवाजे साडेतीन फुटांवर

पाटण;  पुढारी वृत्तसेवा :  कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणात प्रतिसेकंद सरासरी 39,905 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. 105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणात आता तब्बल 104.06 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. यापुढे केवळ 1.19 टीएमसी पाणी सामावून घेण्याची क्षमता शिल्लक राहिली असून आगामी काळातील पाऊस लक्षात घेता बुधवारी सकाळी धरणाचे सहा वक्री दरवाजे दीड फुटांवरून साडेतीन फूट उचलून त्यातून प्रतिसेकंद 31,531 व पायथा वीजगृहातून एका जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून 1,050 असे एकूण 32,581 क्युसेक पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे.

या सोडलेल्या पाण्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणांतर्गत विभागात पावसाचा जोर वाढल्याने धरणात येणार्‍या पाण्याची आवकही वाढत गेली. धरणातील सध्याचा उपलब्ध पाणीसाठा व पाणी सामावून घेण्याची अत्यल्प शिल्लक राहिलेली क्षमता लक्षात घेता सुरुवातीला धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून तर मंगळवारी दुपारी धरणाचे सहा वक्री दरवाजे दीड फूट उचलून त्यातून विनावापर पूर्वेकडे पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतरही अंतर्गत विभागातून येणार्‍या पाण्याची आवक वाढल्याने बुधवारी हेच दरवाजे दीड वरून साडेतीन फूट उचलण्यात आले आहेत.

धरणाची सध्याची एकूण स्थिती लक्षात घेता उपलब्ध पाणीसाठा 104.06 टीएमसी, त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा 99.06 टीएमसी, पाणी उंची 2162.7 फूट, जलपातळी 659.155 मीटर इतकी झाली आहे. सध्या धरणात प्रतिसेकंद सरासरी 39,905 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. एक जूनपासून आतापर्यंत कोयना येथे 4258 मि.मी., नवजा 5182 मि.मी. व महाबळेश्वर येथे 5517 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे . दरम्यान, कोयना धरणांतर्गत विभागासह पूर्वेकडे पाटण तालुक्यातील बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर बुधवारी कमी झाला आहे.

Back to top button