ढेबेवाडी भागात अनेक गावे अंधारात | पुढारी

ढेबेवाडी भागात अनेक गावे अंधारात

ढेबेवाडी ः पुढारी वृत्तसेवा वीज वितरण कंपनीची यंत्रणा कोलमडल्याने ढेबेवाडी – तळमावले विभागातील अनेक गावांसह वाड्या – वस्त्या 15 दिवसांपासून अंधारात चाचपडत आहेत. अनेक ठिकाणी विद्युत वाहक तारांसह विद्युत खांब अक्षरशः मोडून पडल्याने घरांसह शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. याबाबत संबंधित विभागाने तातडीने विद्युत पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा आंदोलन करावे लागेल असा इशारा नागरिकांनी दिला आहे. याबाबत स्थानिक ग्रामस्थ व पदाधिकार्‍यांकडून मिळालेली माहिती अशी, ढेबेवाडी – तळमावले विभागात विद्युत वितरण कंपनीचे अनेक ठिकाणचे विद्युत खांब गंजल्याने त्याची दुरुस्ती करण्याची मागणी वारंवार केली जात होती.

मात्र संबंधित विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यातच सध्या संततधार कोसळणार्‍या वादळी वार्‍यासह मुसळधार अतिवृष्टीमुळे सणबूर, कुठरे, कसणी, कुंभारगाव,काळगाव, धनगरवाडा, पळशी यासारख्या गावांंना याचा तडाखा बसला आहे. विद्युत वाहक तारांसह खांबांचीही पडझड होऊन मोठे नुकसान झाले आहे. कुंभारगाव येथे एका घरावर खांबच कोसळल्याने घराचे नुकसान झाले आहे. सुदैवाने जिवीत हानी झाली नाही. तर धनगरवाडा, पळशी आदी वाल्मिकी पठारावरील गावांमध्ये विद्युत पुरवठा यंत्रणाच कोलमडल्याने मागील 15 दिवसांपासून परिसरातील गावे अंधारात चाचपडत असल्याने संतप्‍त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

सातत्याने तक्रारी करूनही कानाडोळा…
वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. दुरुस्तीबाबत पाठपुरावा करुनही बेजबाबदारपणा दाखविला जातो. मुसळधार पाऊस आणि वादळी वार्‍यात ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन अंधारात बसावे लागते. दुर्दैवाने एखादी दुर्घटना घडली, तर त्याला वीज वितरण कंपनीचे अधिकारीच जबाबदार असतील. त्याविरोधात आवाज उठवावाच लागेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Back to top button