कराड: हुकूमशाही रोखण्यासाठी प्रयत्न करणे गरजेच | पुढारी

कराड: हुकूमशाही रोखण्यासाठी प्रयत्न करणे गरजेच

कराड;पुढारी वृत्तसेवा: हिंदू धर्माचा राजकारणासाठी वापर केला जात असून ही खरी लोकशाही नाही. लोकशाही मोडीत काढून देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे चालली आहे. देशाची अर्थव्यवस्था बिकट झाली असून विकास दर ढासळलेला आहे. कर्ज वाढलेले असून हुकूमशाही येऊ देऊ नका. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सामान्य जनतेने प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

मलकापूर नगरपालिकेकडून स्व. आनंदराव चव्हाण व स्व. प्रेमलाताई चव्हाण यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून प्रेमलाताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियानाचा वर्धापनदिन व विविध कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा निलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, अजित पाटील – चिखलीकर, जयवंत जगताप, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, हिंदुराव पाटील, इंद्रजीत चव्हाण, मंगल गलांडे, शंकरराव खबाले, विद्याताई थोरवडे, धनाजी काटकर, नामदेव पाटील, नितीन थोरात, प्रकाश पाटील, पी.जी.कागदी, बिस्मिला सय्यद, प्राचार्य सतिश माने, मुख्याधिकारी राहूल मर्ढेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राज्यातील सध्याच्या घडामोडींचा विचार करता पैसा आणि हिंदू धर्माचा राजकारणासाठी उपयोग केला जात आहे. त्यामुळे खर्‍या हिंदुत्वाचा विसर पडत आहे. निवडणूक यंत्रणेमध्ये अनेक त्रुटी आहेत. त्या कायदा करून थांबवल्या, तरच घोडाबाजार थांबेल. राज्यात सत्ता स्थापन करताना पक्षांतर कायद्याचे उल्लंघन झाले असून ही त्यांच्यावर कारवाई नाही. पैशाचे महत्व वाढले असून विचारांचे महत्व कमी झाले आहे. कोणताही पक्ष हा विचारांवर आधारलेला असतो. सध्या राजकीय पक्ष पैशावर, जातीवर अवलंबून आहेत.

या जोरावर निवडणुका जिंकत असतील, तर देशाचे भवितव्य व लोकशाही अवघड आहे. राज्याची सत्ता ईडीची भीती दाखवून पैशाचा वापर करून मिळवली आहे. भाजपने अपयश झाकण्यासाठी, सरकारी कंपन्या, शासकीय जमीन विकण्याचा सपाटा लावला आहे. स्व. आनंदराव चव्हाण व प्रेमलाताई चव्हाण दाम्पत्यांनी माझ्यावरती चांगले संस्कार केले आहेत. अतिशय खडतर परिस्थितीतही काँग्रेसचे विचार जिवंत ठेवल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले. अजित पाटील-चिखलीकर व इतरांची भाषणे झाली. उपनगराध्यक्ष
मनोहर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. ज्ञानदेव साळुंखे, पूनम पवार, पूजा तांदळे यांनी सूत्रसंचालन केले. महिला बालकल्याण सभापती गितांजली पाटील यांनी आभार मानले.

नागरिकांच्या सहकार्यामुळेच योजना यशस्वी…

शहरातील नागरिकांच्या सहकार्याने योजना यशस्वी होत असल्याने त्यांना पारितोषिकेही मिळत आहे, ही अभिमानास्पद बाब आहे. सर्वच योजना नाविन्यपूर्ण असून पथदर्शी बनत आहेत. सर्वसामान्य नागरिकांचा विकास डोळ्यासमोर ठेवून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मलकापूरनगरपरिषदेच्या माध्यमातून सदैव कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी केले

Back to top button