सातार्‍यातील ‘तो’ मर्डर गँगवॉरमधून | पुढारी

सातार्‍यातील ‘तो’ मर्डर गँगवॉरमधून

सातारा : पुढारी वृत्तसेवा : सातारा शहरातील नटराज मंदिर परिसरात अर्जुन यादव ऊर्फ राणा याचा खून गँगवॉरमधून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. खुनात पाच जणांचा सहभाग असल्याचे समोर आले असून त्यात तीन अल्पवयीन मुले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पूर्ववैमनस्यातूनच अर्जुनचा गेम बजावला असून मास्टरमाईंडसह मूळ दोघे सूत्रधार पसार आहेत. दरम्यान, या घटनेत दोन बंदुकांचा वापर झाल्याचेही समोर येत आहे.

पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले, शनिवारी सातार्‍यात अर्जुन यादव याचा खून झाल्यानंतर एलसीबीचे स.पो.नि. रमेश गर्जे यांच्या तपासात यापाठीमागे वाई, भुईंज येथील गँगवॉर असल्याचे समोर आले. त्यानुसार एलसीबीने तपासासाठी पथक तयार केले. सोमवारी सकाळी या खून प्रकरणातील संशयितांची माहिती एलसीबीला मिळाल्यानंतर त्यांनी वाई परिसरातून त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी संशयितांकडे चौकशीला सुरुवात केल्यानंतर त्यांनी खुनाची कबुली दिली.

मात्र यातील संशयित तिघांचा कोणाचाही थेट अर्जुनसोबत वाद नसल्याने मारण्याचे कारण काय, असे पोलिसांनी विचारताच संशयितांनी त्यांनी अभिजीत ऊर्फ भैया शिवाजी मोरे (रा. गंगापुरी, वाई) व सोमनाथ ऊर्फ सोन्या शिंदे (रा. रविवार पेठ, वाई) यांच्यासाठी मारले असल्याची कबुली दिली. 2020 मध्ये अर्जुन यादव याने भैया मोरे याच्यावर फायरिंग करून जखमी केले होते. याच घटनेचा राग भैया मोरे याच्या मनात होता. गेली दोन वर्षे अर्जुन यादव याला संपवण्याचा प्रयत्न सुरू होता. अखेर शनिवारी त्यात त्यांना यश आले.

अर्जुन याच्यावर दोन गोळ्या झाडल्या गेल्या आहेत. या गुन्ह्यासाठी एकूण दोन बंदुकीचा वापर झाल्याची शक्यता पोलिस अधीक्षकांनी व्यक्त केली आहे. बंदूका बाबत पोलिसांनी संशयितांना प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र संशयित तिघेजण पोलिसांना तपासात सहकार्य करेना. यामुळे पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना शहर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. अल्पवयीन मुलांना पुढे करुनच भैय्या मोरे व सोन्या शिंदे या दोघांनी हे हत्याकांड घडवून आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

ही कारवाई एसपी अजयकुमार बन्सल, अपर पोलिस अधीक्षक अजित बोर्‍हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि किशोर धुमाळ, सपोनि रमेश गर्जे, फौजदार अमित पाटील, पोलिस शरद बेबले, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, विशाल पवार, रोहित निकम, मुनीर मुल्ला, स्वप्नील दौंड यांच्या पथकाने केली.

Back to top button