आ. महेश शिंदे यांच्या समर्थनार्थ लावलेल्या बॅनरवर शाईफेक | पुढारी

आ. महेश शिंदे यांच्या समर्थनार्थ लावलेल्या बॅनरवर शाईफेक

कोरेगाव : कोरेगाव मतदारसंघाचे आ. महेश शिंदे यांच्या समर्थनार्थ तालुक्यात विविध ठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. रविवारी रात्री तांदुळवाडी येथील बॅनरवर काही अज्ञातांनी शाई फेक करून याचा निषेध नोंदवण्याचा प्रयत्न केला. ना. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड करत सावता सुभा केला आहे. त्यांच्यासमवेत असलेले बंडखोर आमदार हे गुवाहटी येथे आहे. यामध्ये कोरेगावचे आ. महेश शिंदे यांचाही समावेश आहे.

बंडखोरीवरून राज्यासह सातारा जिल्ह्यात प्रतिक्रिया उमटत आहे. काही जणांकडून याचे समर्थन तर काहींकडून विरोध होत आहे. शिवसैनिक रस्त्यावर उतरल्याने हा संघर्ष वाढत चालला आहे. कोरेगावचे आ. महेश शिंदे यांच्या समर्थनार्थ अनेक गावांमध्ये ‘सदैव तुमच्यासोबत’ अशी टॅगलाईन वापरत बॅनर लावण्यात आले आहेत. स्व. बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, ना.एकनाथ शिंदे यांचे फोटो असलेले अनेक बॅनर तालुक्यात लागले आहे.

आ. शिंदे यांच्याविरोधात कोरेगावमध्ये शिवसैनिकांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, तालुक्यातील तांदूळवाडी येथे आ. शिंदे यांच्या समर्थनार्थ लावलेल्या बॅनरवर शाई फेक करण्यात आली आहे. हा प्रकार रविवारी रात्री झाला आहे. ही शाईफेक कुणी केली याची माहिती मिळालेली नाही.

Back to top button