सातारा : पाच महिन्यांत 419 अपघात; 236 बळी | पुढारी

सातारा : पाच महिन्यांत 419 अपघात; 236 बळी

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यांत 419 अपघात झाले आहेत. यामध्ये तब्बल 236 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 314 जण गंभीर जखमी झाले आहेत. वाहनचालकांचा निष्काळजीपणा, खड्डे, सहापदरीकरणातील त्रुटी कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळेच पुणे-बेंगलोर महामार्ग व राज्यमार्ग मृत्यूचे सापळे बनले आहेत. या वाढत्या अपघातांची महामार्ग पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली असून, ब्लॅक स्पॉट हटवण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे.

जिल्ह्यातून 136 किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग जातो. कराड तालुक्यातील मालखेड गावच्या हद्दीतून सुरू झालेला हा महामार्ग खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडी येथे संपतो. 136 किलोमीटरच्या अंतरात अपघातांमध्ये झालेली वाढ प्रशासनाला चिंता करायला लावणारी आहे.
राष्ट्रीय महामार्गावर गत पाच महिन्यांच्या कालावधीत 93 अपघात झाले असून यात 56 जणांचा मृत्यू तर 70 जण जखमी झाले आहेत. राज्यमार्गावर झालेल्या 173 अपघातात 101 मृत्यू तर 161 जण जखमी झाले आहेत. इतर गावांतील 153 रस्ते अपघातात 79 मृत्यू तर 93 जण जखमी झाले आहेत.

महामार्गावरील काही ठिकाणची धोकादायक वळणे अपघाताला कारणीभूत ठरत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. मात्र, याहीपेक्षा वाहनचालकांचा निष्काळजीपणाही जीवघेणा ठरत आहे. याशिवाय अनेक वाहनचालक मद्य प्राशन करून वाहन चालवत आहेत. त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात वाढत आहेत.

मद्य प्राशन करून वाहन चालवणे, वेगावर नियंत्रण न ठेवणे, ओव्हरटेक करणे, वाहन चालवण्याच्या प्रशिक्षणाचा अभाव, धोकादायक वळणे, वाहनांतील तांत्रिक दोष, महामार्गावरील खड्डे यामुळे अपघात होत आहेत. दरम्यान, खंबाटकी बोगद्यातील एस वळणावर पाच महिन्यांत 9 जणांचा बळी गेला आहे. हे वळण दुरुस्त करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. जोपर्यंत हे वळण दुरुस्त होत नाही तोपर्यंत हे वळण आणखी किती जणांचा बळी घेणार? असा प्रश्‍न आहे.

44 ब्लॅक स्पॉट हटवले

महामार्गावर एकूण 52 ब्लॅक स्पॉट आहेत. यातील 44 ब्लॅक स्पॉट नुकतेच हटवण्यात आले आहेत. अद्याप 8 ब्लॅक स्पॉट बाकी आहेत. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी या वाढत्या अपघातांची दखल घेतली असून, महामार्ग पोलिसांना सातत्याने गस्त घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राँग साईडने जाणार्‍या तसेच लेन कटिंग करणार्‍या चालकांवर तातडीने कारवाई करण्यात येत आहे.

Back to top button