ना. शंभूराज देसाईंच्या बंडखोरीने निष्ठावंत संतप्त | पुढारी

ना. शंभूराज देसाईंच्या बंडखोरीने निष्ठावंत संतप्त

पाटण ; गणेशचंद्र पिसाळ : शिवसेनेत प्रवेश करतानाच ना. शंभूराज देसाई यांना शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी राज्य सहकार परिषद अध्यक्षपद तर महाविकास आघाडी सरकार येताच मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गृह खात्यासह महत्त्वाच्या एकूण पाच खात्यांचे राज्य मंत्रीपद देऊन मतदारसंघासाठीही कोट्यवधींचा निधी दिला. तरीही ना. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सेनेशी प्रतारणा केल्याने ना. देसाई यांच्या बंडखोरीबाबत जिल्हा व पाटण विधानसभा मतदारसंघातील निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये संतप्त भावना आहेत. त्याचवेळी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी, राष्ट्रीय काँग्रेससह विरोधातील भाजपाही सध्या ‘वेट अँड वॉचच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.

पाच दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. पाटण विधानसभा मतदारसंघाचीही तीच अवस्था आहे. प्रामुख्याने पाटण तालुक्यातील पोटापाण्यासाठी मुंबईत मोठ्या प्रमाणावर असणारे चाकरमान्यांत निष्ठावंत शिवसैनिकांची मोठी संख्या आहे. मागील दोन-तीन विधानसभा निवडणुकात याच निष्ठावंतांच्या जीवावर ना. देसाई आमदार व सध्या राज्य मंत्री आहेत.

ना.देसाईंना शिवसेनेने अगदी सुरुवातीपासूनच सर्वकाही दिले मात्र त्यांच्याकडून नेहमीच पक्ष, वरिष्ठ नेत्यांसह निष्ठावंताची प्रतारणा झाली हा इतिहास आहे. पूर्वी काँग्रेसमध्ये असलेल्या ना. देसाई यांनी काँग्रेस अन्याय करत असल्याच्या भूमिकेतून सेनेचा धनुष्य हाती घेतला. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या साक्षीने त्यांचा सेना प्रवेश झाला. त्याचवेळी ठाकरेंनी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नातवाचा सन्मान करताना व्यासपीठावर ना. देसाईंना सहकार परिषद अध्यक्षपद, राज्य मंत्रिपदाचा दर्जा व लाल दिव्याची गाडीही बहाल केली. मात्र पक्षाशी ते एकनिष्ठ राहिले नाहीत.

तत्कालीन जिल्हा परिषद सत्तेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांना केलेली साथ असो अथवा दादांच्या आत्मक्लेशवेळी त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचा प्रयत्न, अनेकदा तत्कालीन काँग्रेस मुख्यमंत्री, मंत्र्यांना उघडपणे साखर कारखान्यावर आमंत्रण, जाहीर सभा, यापूर्वीच्या भाजपा, सेनेच्या राज्यातही देवेंद्र फडणवीसांच्या मैत्रीचे अनेकदा दाखले देण्याचा प्रयत्न असे अनेक प्रसंग ना. देसाईंच्या माध्यमातून सेनेला पाहायला मिळाले होते.

तरी देखील 2019 च्या विधानसभा निवडणुकीत याच सेनेने देसाईंना पहिल्याच टप्प्यात गृह, अर्थ अशा महत्वपूर्ण पाच खात्यांचे राज्यमंत्री पद दिले. ना. एकनाथ शिंदे किंवा अन्य मंडळी त्यांच्यावर अन्याय झाला म्हणून किंवा राष्ट्रवादी व राष्ट्रीय काँग्रेसबाबत नाराज असल्याने बंडखोर होत असतील तर देसाईंवर सेनेने कोणता अन्याय केला? याशिवाय ते सातत्याने राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, अजित पवार, काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांच्याही सातत्याने संपर्कात होते. त्यामुळे मग त्यांना या मित्रपक्षांनी नक्की कोणता त्रास दिला? पाटण मतदारसंघात निधी देताना महाविकास आघाडी सरकार कुठे कमी पडले याचाही लेखाजोखा देसाईंकडून अपेक्षित आहे.

आजवर ना. देसाईंना सेनेने काय दिले व त्याबदल्यात सेनेला ना. देसाईंनी काय दिले ? या इतिहास आणि वर्तमानामुळेवर सध्या तालुक्यातील राजकीय वातावरण अक्षरशः गढूळ झाले आहे. आता देसाईंची आमदारकी असो किंवा मंत्रीपद सद्यस्थितीत कायदेशीर, तांत्रिक अडचणींमध्ये नक्की काय होणार याची चिंताही देसाई कट्टर समर्थकांमध्ये पहायला मिळत आहे. ना.देसाईंची ही भूमिका निष्ठावंत शिवसैनिकांना पटलेली नाही. त्याचवेळी त्यांच्या गटाच्या समर्थकांनाही ती रूचलेली नाही.

एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ भलेही मतदार संघात काही बॅनर लावले असले तरी त्यावर कोणाच्याही निष्ठावंत शिवसैनिकांची नावे नसल्याने ही बॅनरबाजी कोणी कोणी असाही प्रश्‍न आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तथा राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री विक्रमसिंह पाटणकर व राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या पाटणकर गटासह राष्ट्रीय काँग्रेस पक्षातही कमालीची शांतता आहे.‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत दोन्ही पक्षातील मान्यवर नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत. विरोधी भाजपाचीही सध्या‘थांबा आणि पाहा ’ हीच भूमिका आहे.

ना. देसाई वचन पाळणार..?

‘वेळप्रसंगी राजकारण सोडेन पण शिवसेना सोडणार नाही ’ असे ना. देसाईंनी वारंवार जाहीर सभेत तालुक्यातील जनतेला वचन दिल्याचे अनेक दाखले आहेत. त्यांच्या बंडखोरीच्या राजकीय घडामोडींनंतर आगामी काळात ना. देसाई सेनेत राहूनच निष्ठा सिद्ध करणार, सेनेतून बाहेर पडणार की तालुक्याला दिलेल्या वचनाला जागून राजकारण सोडणार याचीची चर्चा मतदार संघात आहे.

Back to top button