

पुढारी ऑनलाईन डेस्क : '२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने जेवढ्या जागा जिंकल्या तेवढ्या जागा विरोधकांच्या संपूर्ण आघाडीलाही मिळवता आल्या नाही. असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांच्या इंडिया आघाडीवर टीका केली. तसेच भाजप आणि एनडीएच्या तिसऱ्या कार्यकाळात मोठ्या निर्णयांचा एक नवा अध्याय लिहिला जाईल, ही मोदींची गॅरंटी आहे. आणि १९६२ नंतर पहिल्यांदाच कुठलेही सरकार दोन टर्म पूर्ण करून तिसऱ्यांदा सत्तेत येत आहे,' असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाले. या पार्श्वभूमीवर निकालाच्या दिवशी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप मुख्यालयात भाषण केले. यावेळी बोलताना त्यांनी देशातील पक्ष कार्यकर्त्यांचेही तोंडभरून कौतुक केले. सोबतच निवडणूक आयोगाचेही त्यांनी निवडणुकीच्या तयारीपासून सर्व गोष्टी व्यवस्थित पार पाडल्या त्याबद्दल त्यांचे भरभरून कौतुक केले. विशेष म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वात आम्ही चांगले प्रदर्शन केले तसेच बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वात चांगले प्रदर्शन केले म्हणत दोन राज्यातील दोन प्रमुख नेत्यांचा विशेष उल्लेख केला. भारत देशात या निवडणुकीत जेवढ्या लोकांनी मतदान केले ती संख्या जगातील अनेक देशांच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे, याचाही उल्लेख पंतप्रधान मोदींनी बोलताना केला.
यावेळी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सुरुवातीला भाषण केले आणि तोंडभरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले. गेल्या दहा वर्षातील विविध योजनांचा उल्लेख जे. पी नड्डा यांनी केला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशात सर्वत्र भाजप पसरल्याचेही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप मुख्यालयात येत असताना फुले उधळून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. ते मंचावर आल्यानंतर पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले
पंतप्रधान मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे :
अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, ओडीसा, सिक्कीम या ठिकाणी पक्षाला चांगले यश मिळाले.
भाजप ओडिशामध्ये सरकार बनवणार आहे. विधानसभेसह लोकसभा निवडणुकीतही पक्षाची चांगली कामगिरी राहिली.
भाजपने केरळमध्ये जागा मिळवली, केरळच्या कार्यकर्त्यांचे विशेष अभिनंदन.
तेलंगणामध्ये आम्ही दुप्पट जागा जिंकल्या. मध्यप्रदेश, गुजरातसह काही राज्यात आम्ही जवळजवळ पूर्ण जागा जिंकल्या.
तिसऱ्यांदा सरकार बनवण्यासाठी देशाने जनादेश दिला आहे.
माझी आई गेल्यानंतर माझ्यासाठी ही पहिली निवडणूक होती. मात्र देशातील लाखो माता-भगिनींनी, बहिणींनी मला आईची कमी वाटू दिली नाही.
विकसित भारताचे स्वप्न हे स्वप्न नसून लक्ष्य आहे.