Lok sabha Election 2024 Results : विधानसभेत पराभव.. लोकसभेत विजय.. कोण आहेत डॉ. हेमंत सवरा?

Lok sabha Election 2024 Results :  विधानसभेत पराभव.. लोकसभेत विजय.. कोण आहेत डॉ. हेमंत सवरा?
Published on
Updated on

[author title="मंगेश तावडे" image="http://"][/author]

पालघर; पुढारी वृत्तसेवा : 2019 ची लोकसभा निवडणूक वगळता पालघर (अज) लोकसभा निवडणुकीत गेली अनेक वर्षे भाजपचा खासदार निवडून येत असे. त्याचीच पुनरावृत्ती आज घडली असून 2019 च्या विधानसभेत पराभूत झालेल्या डॉ. हेमंत सवरा यांनी 6 लाख 1 हजार 244 मते पदरात पाडून भाजपचा बालेकिल्ला अबाधित राखला. माजी मंत्री विष्णू सवरा यांचे ते ज्येष्ठ पुत्र असून 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने लढविण्यात आलेल्या पालघर (अज) लोकसभा निवडणुकीत डॉ. हेमंत सवरा प्रचंड मताधिक्याने निवडून आले आहेत. जवळपास 6 लाख मते पदरात पाडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या श्रीमती भारती भरत कामडी यांचा त्यांनी 1 लाख 83 हजार 306 मतांनी पराभव केला. कामडी यांना 4 लाख 17 हजार 938 मते मिळाली असून तिसरे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार आमदार राजेश पाटील तिसऱ्या क्रमांकावर (2 लाख 54 हजार 517) आहेत. माजी मंत्री कै. विष्णू सवरा यांचे ज्येष्ठ पुत्र असलेले डॉ. सवरा यांनी पुन्हा एकदा पालघर जिल्ह्यात भाजपचा बालेकिल्ला अबाधित राखल्याने भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे.

नवनिर्वाचित खासदार डॉ. हेमंत सवरा यांचे वडील कै. विष्णू सवरा हे गेली 30 वर्षे विक्रमगड विधानसभेचे प्रतिनिधित्व करीत असताना त्यांच्या हयातीतच आपल्या मुलाला 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. स्वतः मंत्री असताना प्रकृती साथ देत नसल्याने त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर यावे लागले होते. मात्र, पुत्र डॉ. हेमंत सवरा यांना वडिलांच्या जागेवर निवडून येता आले नव्हते. त्यांनी मात्र भारतीय जनता पक्षाच्या प्रवाहातच राहणे पसंत केले होते. त्याचे प्रत्यंतर आता खासदारकीच्या रुपाने का होईना प्रत्यक्षात उतरले आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना 20 हजार मतांच्या फरकाने पराभव पत्करावा लागला होता. तरीही त्यांनी पक्षाची कास सोडली नाही आणि त्यांना विष्णू सवरा यांचे वारसदार म्हणून उमेदवारी जाहीर झाली.

नवनिर्वाचित खासदार डॉ. हेमंत सवरा हे हाडांचे (ऑर्थोपेडिक) डॉक्टर आहेत. तर त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. श्रद्धा सुद्धा (नाक, कान, घसा तज्ज्ञ) डॉक्टर आहेत. भिवंडी आणि वाडा तालुक्याच्या मध्यभागी कुडूस या छोटेखानी शहरात त्यांचे क्लिनिक असून गोरगरीब रुग्णांना ते रुग्णसेवा देत आहेत. दरम्यान, पालघर जिल्ह्यातील कुपोषण घालवायचे असेल तर डॉ. हेमंत सवरा यांच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने गती येणार आहे.

वाडा शहरातील उत्कर्षनगर येथे आई श्रीमती जयश्री यांच्यासोबत बहीण निशा आणि कनिष्ठ बंधू संदेश राहतात. संदेश हे पायलट आहेत. त्यामुळे उच्चशिक्षित असा खासदार मिळाल्याने सर्वांनीच डॉ. सवरा यांचे कौतुक केले आहे. बहीण निशा सवरा यांना सुद्धा वाडा शहर नगरपंचायत निवडणुकीत थेट नगराध्यक्षपद निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले होते.

मात्र, या कुटुंबाने आपल्या पराभवाचे खापर कधीच कार्यकर्ते आणि नेतेमंडळीच्या माथी फोडलेले नाही. त्यामुळे या कुटुंबाशी जोडलेले कार्यकर्त्यांचे मोहोळ कायमच पाहायला मिळाले. अखंड पालघर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला सर्व प्रमुख नेतेमंडळीच्या नेतृत्वाखाली अबाधित राखण्यात यश आले, अशी प्रतिक्रिया डॉ. सवरा यांनी शेवटी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news