सातारा : लोणंदकरांना माऊलींच्या दर्शनाची आस | पुढारी

सातारा : लोणंदकरांना माऊलींच्या दर्शनाची आस

लोणंद; शशिकांत जाधव :  गत दोन वर्षे कोरोनामुळे संत ज्ञानेश्‍वर माऊलींचा पालखी सोहळा झाला नाही. यामुळे भाविकांची निराशा झाली. परंतु, यंदा धडाक्यात वारीला सुरूवात झाली आहे. लोणंदमध्ये वारीचा अडीच दिवसांचा मुक्‍काम असल्याने लोणंदकरांना माऊलींच्या पालखीची आस लागून राहिली आहे. दोन वर्षे पालखीच्या दर्शनाला व्याकुळ असणार्‍या भाविकांची इच्छा पुरी होणार असून यानिमित्त लोणंदमध्ये जनसागर लोटणार आहे. दरम्यान, या पार्श्‍वभूमीवर पोलिस यंत्रणा सज्ज झाली असून 2200 अधिकारी व कर्मचार्‍यांचा फौजफाटा तैनात राहणार आहे, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे व सपोनि विशाल वायकर यांनी दिली.

माऊलींच्या पालखी सोहळ्याचे सातारा जिल्ह्यातील लोणंद येथे दोन, तरडगाव एक, फलटण येथे दोन, बरड एक अशा सहा मुक्‍कामासाठी आगामन होणार आहे. कोरोनानंतर प्रथमच पालखी लोणंदमध्ये येणार असल्याने सर्वच विभागांनी व नागरिकांनी जय्यत तयारी केली आहे. कोरोनानंतर होेणार्‍या या वारीमध्ये भाविकांचा मोठया प्रमाणात सहभाग आहे.

माऊलींच्या पालखी सोहळा बंदोबस्तासाठी 1 अप्पर पोलिस अधीक्षक, 7 पोलिस उपअधीक्षक, 12 पोलिस निरीक्षक, 76 सपोनि, 615 पोलिस जवान, 170 महिला पोलिस, 160 वाहतूक पोलिस अंमलदार, 96 पोलीस अधिकारी व 945 अंमलदार, 900 होमगार्ड, 100 महिला होमगार्ड अशा सुमारे 2041 जणांच्या फौजफाट्याची नेमणूक करण्यात आली आहे. याचबरोबर एक एसआरपीएफ कंपनी, 2 क्युआरटी कंपनीलाही पाचारण करण्यात येणार आहे. लोणंद पालखीतळावर भाविकांना माऊलींच्या दर्शनासाठी खंडाळा बाजूकडे दोन व लोणंद बाजूकडे दोन अशा महिलांसाठी व पुरुषांसाठी चार स्वतंत्र दर्शन रांगा तयार करण्यात आल्या आहेत. त्यापैकी लोणंद गावात शास्री चौकाच्या बाजूने व खंडाळा रोडने बिरोबा वस्तीच्या दिशेने अशा एक पुरुष व एक महिला अशा रांगा लावण्यात येणार आहेत. त्यामुळे भाविकांना दर्शन गोंधळ व गर्दी न होता चांगल्या पद्धतीने मिळणार आहे.

पालखी सोहळा काळात मुक्‍काम व गर्दीच्या ठिकाणी समाजकंटक व गुन्हेगार यांच्यावर नजर ठेवण्यासाठी, महिलांची छेडछाड, दागिने चोरी करणार्‍यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी 5 अधिकारी व 50 कर्मचार्‍यांचे पथक कार्यरत राहणार आहे. तसेच ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेराद्वारे देखरेख ठेवली जाणार आहे.

पालखीतळावर वॉच टॉवर उभारण्यात येणार आहे. त्या ठिकाणी मोठ्या क्षमतेची दुर्बिण व हत्यारसहीत पोलिस कर्मचार्‍यांची नेमणूक केली जाणार आहे. सोहळा काळात संशयास्पद बेवारस बॅगा आढळून आल्यास त्वरित पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्यात यावे, त्यासाठी 100 नंबर डायल करावा.

पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वीच सकाळपासूनच निरा बाजूकडून लोणंदकडे वारकरी दिंडीचे ट्रक, पाण्याचे टँकर येत असतात. त्यांना अडथळा येऊ नये म्हणून पाडेगावकडे जाणारी वाहतूक लोणंद येथील अहिल्यादेवी चौकात बंद करण्यात येत असते. पाडेगावला जाणारी वाहतूक विनायकराव पाटील वस्ती, पिंपरे बु॥ मार्गे व अन्य मार्गाने वळवण्यात येणार आहे.

Back to top button