महाबळेश्वर : ना. देसाई-आ. महेश शिंदे दरे गावी यायचे | पुढारी

महाबळेश्वर : ना. देसाई-आ. महेश शिंदे दरे गावी यायचे

महाबळेश्वर; पुढारी वृत्तसेवा : ना. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटी येथे असलेले सातारा जिल्ह्यातील पाटणचे आमदार तथा गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई तसेच कोरेगावचे आ. महेश शिंदे हे वारंवार ना. एकनाथ शिंदे यांच्या दरे तांब येथील निवासस्थानी यायचे, विकासासंदर्भात त्यांच्या चर्चाही येथे व्हायच्या, अशी माहिती समोर येत आहे.

ना. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रात त्यांच्या गाव परिसराची चर्चा होत आहे. ना. शंभूराज देसाई व आ. महेश शिंदे हे दोघेही सातारा जिल्ह्यातील असल्याने ते दरे येथे यायचे. त्यावेळी या तिघांमध्ये मतदार संघातील विकासकामांबाबत चर्चा व्हायची की अन्य कोणत्या बाबींवर? याबाबतचा तपशील मात्र मिळू शकला नाही. एकनाथ शिंदे यांच्या मूळ गावातील विविध घडामोडींना आता अनेक संदर्भ दिले जात आहेत. शिंदे यांना भेटण्यासाठी यापूर्वीही अनेक नेतेमंडळी गावी दरे येथे येवून गेली होती. अनेकांशी एकनाथ शिंदे यांची विविध विषयांवर चर्चाही घडल्या आहेत.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या अनेक घटना चर्चेत येवू लागल्या आहेत. ते 2000 साली गावी सहकुटुंब आलेले असताना त्यांच्या तीन मुलांपैकी सुभादा व दिपेश या दोन मुलांचा गावानजीक असलेल्या शिवसागर जलाशयात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेमुळे व्यथीत होवून एकनाथ शिंदे जवळपास दहा ते बारा वर्षे गावाकडे फिरकले नव्हते, असेही काहींनी सांगितले.

Back to top button