कराडची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध | पुढारी

कराडची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

कराड : पुढारी वृत्तसेवा

राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार प्रभाग रचनेचा कार्यक्रम व अनुसूचित जाती आरक्षण झाल्यानंतर निवडणूक आयोग्याच्या सूचनेनुसार मंगळवारी प्रारूप मतदार यादी कराड नगरपालिकेत प्रसिध्द करण्यात आली. मात्र या मतदार यादीमध्ये बराच गोंधळ असल्याची चर्चा नागरिकांमधून आहे.

दरम्यान, दि.27 जून पर्यंत प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी असून दि. 1 जुलै रोजी अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या अधिप्रमाणित प्रसिध्द करणे व दि. 5 जुलै रोजी मतदार केंद्राची यादी प्रसिध्द करणे आणि मतदान केंद्र निहाय मतदार याद्या प्रसिध्द करण्यात येणार आहेत. राज्यातील 207 नगरपालिकांच्या द्विसदस्यीय प्रभाग रचनेचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने फेब्रुवारी महिन्यात सुरू केला होता. तथापि राज्य शासनाने प्रभाग रचना व निवडणुका जाहीर करण्याचे अधिकार स्वत:कडे घेण्याचा कायदा केल्याने या कार्यक्रमास स्थागिती देण्यात आली होती.

मात्र सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या आदेशानुसार हा प्रभाग रचनेचा कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरू असून मतदार यादी मंगळवारी प्रसिध्द करण्यात आली आहे. या मतदार यादीमध्ये अनेक चुका असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले असून सध्याच्या प्रभाग रचनेनुसार मतदार यादी नसल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. एका प्रभागातील मतदार दुसर्‍या प्रभागात तर दुसर्‍या प्रभागातील मतदार इतर कोणत्याही प्रभागात गेले असल्याचे दिसून आले असून यामुळे नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. दरम्यान, नागरिकांच्या हरकती व सूचना दि. 27 पर्यंत दाखल करण्याची मुदत असून तसे पुरावे सादर झाल्यास सुनावणी होवून योग्य तो बदल करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी सांगतिले.

Back to top button