लोणंद : पालखी तळ परिसरातील अतिक्रमणांना दणका | पुढारी

लोणंद : पालखी तळ परिसरातील अतिक्रमणांना दणका

लोणंद पुढारी वृत्तसेवा : श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा लोणंद येथे अडीच दिवसाच्या मुक्‍कामासाठी येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर लोणंद पालखी तळ, पालखी मार्ग व वाहतुकीला अडथळा ठरणार्‍या अतिक्रमणांविरोधात नगरपंचायत आणि बांधकाम विभागाने आक्रमक भूमिका घेत सोमवारी लोणंद शहर व परिसरात अतिक्रमण हटाव मोहिम राबवली. या मोहिमेत वाहतुकीला अडचण ठरणार्‍या अतिक्रमणांना दणका देण्यात आला. त्यामुळे पालखी तळाने मोकळा श्‍वास घेतला आहे.

दि. 28 व 29 रोजी श्री संत ज्ञानेश्‍वर माऊलींचा पालखी सोहळा लोणंदमध्ये दाखल होत आहे. त्यासाठी सर्व विभागांकडून तयारी सुरू आहे. पालखी सोहळ्याच्या नियोजनाच्या पुणे, सातारा, लोणंद येथील बैठकीतील मागणीनुसार पालखी तळ, पालखी सोहळा मार्ग व वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बैठकीत दिल्या होत्या. त्यानुसार नगरपंचायत आणि बांधकाम विभागाने अतिक्रमण धारकांना नोटीसा बजावत 24 तासात हे अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, प्रशासनाच्या या नोटिसीला अतिक्रमणधारकांनी दाद दिली नाही. त्यामुळे सोमवारी अतिक्रमण हटाव मोहिम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार सोमवारी दुपारी तहसिलदार दशरथ काळे, मुख्याधिकारी संजय गायकवाड, सपोनि विशाल वायकर, शाखा अभियंता पी. डी. मुस्ताद या अधिकार्‍यांच्या उपस्थितीत व चोख पोलिस बंदोबस्तात या कारवाईला सुरूवात झाली. प्रारंभी एस.टी. स्टॅन्ड, नगरपंचायत, लक्ष्मी रोड, तानाजी चौक, गांधी चौक या पालखी मार्गावरील अतिक्रमणे काढण्यात आली. त्यानंतर पालखी तळाच्या पूर्व व दक्षिण बाजूकडील टपर्‍या, पत्र्याचे शेड आदी अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आली. यावेळी अधिकारी व अतिक्रमणधारकांमध्ये जोरदार वादावादी झाली. यावेळी धनदांडग्यांची पक्‍की बांधकामे तशीच ठेवून गोर गरिबांच्या टपर्‍या काढण्यात आल्याचा आरोप टपरीधारकांनी केला. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते.

दोन वर्षांच्या कालखंडानंतर माऊलींचा सोहळा येत आहे. त्यामुळे वारकरी व भाविकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे ही अतिक्रमण मोहीम लवकर राबवून अन्य कामे हाती घेण्यात येणार असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. माऊलींच्या पालखी सोहळ्यापूर्वी दरवर्षी अतिक्रमण मोहिम हटवली जाते. परंतु, ‘ये रे माझ्या मागल्या’प्रमाणे रस्त्यांवरील अतिक्रमणाची अवस्था होऊन वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असते. त्यामुळे प्रशासनाने ही अतिक्रमणे पुन्हा होेणार नाहीत, याची काळजी घ्यावी, अशी मागणी होत आहे. ही अतिक्रमण हटाव मोहिम राबवल्याने पालखी तळ व पालखी मार्गाने मोकळा श्‍वास घेतला आहे. या कारवाईवेळी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र, प्रशासनाने कुणालाही न जुमानता मार्ग मोकळा केला.

टपरीधारक – अधिकार्‍यांमध्ये वादावादी

हेही वाचा

Back to top button