पिंपरी: इंद्रायणीचा तीर वारकर्‍यांच्या भेटीने गहिवरला

पिंपरी: इंद्रायणीचा तीर वारकर्‍यांच्या भेटीने गहिवरला

प्रसाद जगताप

पिंपरी: कोरोनाच्या दोन वर्षांच्या निर्बंधांमुळे पालखी सोहळा होऊ शकला नाही. त्यामुळे विठ्ठल-रखुमाई, ज्ञानेश्वर माउली आणि संत तुकाराम महाराज यांचे दर्शन होऊ शकले नाही. तसेच, इंद्रायणीसुद्धा वारकर्‍यांच्या भेटीसाठी आसुसलेली होती. सोमवारी इंद्रायणीचा तीर वारकर्‍यांच्या भेटीने जणूकाही गहिवरला होता.

'ग्यानबा तुकाराम'चा जयघोष
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यादरम्यान हाती भगव्या पताका, गळ्यात तुळशीहार, डोईवर तुळशी वृंदावन, सोबतीला फुगड्यांचे फेर, टाळ-मृदंगांचा गजर आणि प्रत्येकाच्या ओठांवर ग्यानबा तुकारामचा जयघोष असल्यामुळे संपूर्ण देहूनगरी दुमदुमून गेली होती.

लोटला भक्तीचा सागर…
कोरोनामुळे गेली दोन वर्षे पालखी सोहळ्याला बंदी होती. मोजक्याच वारकर्‍याच्या उपस्थितीत पालखी सोहळा झाला. यंदा मात्र पालखी सोहळ्याला परवानगी मिळाली. त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून वारकरी देहूनगरीत दाखल झाले होते. त्यांच्या आगमनाने देहूगावातील वातावरण चैत्यन्यपूर्ण झाले होते. येथे जमलेल्या वारकर्‍याची गर्दी जणू काही भक्तिसागराप्रमाणेच भासत होती.

सोहळ्यात आली एकात्मतेची प्रचिती
हाती पताका घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून देहूगावात पालखी प्रस्थान सोहळ्याला सोमवारी वारकर्‍यानी हजेरी लावली होते. विविध धर्म-जातीचे लोक एकत्र येऊन पांडुरंगाच्या नामाचा जयघोष करीत होते. या भक्तिमय वातावरणात वारकर्‍याच्या उत्साहाला उधाण आले होते. त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. अशा वातावरणात विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, आई का जी तुम्ही, या तुकाराम महाराजांच्या अभंगाची या वेळी प्रचिती येत होती…

वासुदेवांची हजेरी…
पालखी प्रस्थान सोहळ्यात नेहमी वारकर्‍याचीच गर्दी पाहायला मिळते. या वेळी असलेल्या पालखी प्रस्थान सोहळ्याला वासुदेवांचीसुध्दा गर्दी पाहायला मिळाली. इंद्रायणीकाठी विविध जिल्ह्यांतून आलेले वासुदेवसुध्दा पाहायला मिळाले. इतर वेळी भल्या सकाळी येऊन जागविणारे वासुदेव आता कमीच दिसतात. देहूगावात मात्र या वासुदेवांची रेलचेल पाहायला मिळाली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news