सोनगाव येथे विवाहितेची आत्महत्या | पुढारी

सोनगाव येथे विवाहितेची आत्महत्या

फलटण ; पुढारी वृत्तसेवा : सोनगाव, ता. फलटण येथे माहेरच्या लोकांनी हुंडा दिला नाही. तसेच मानसन्मान दिला नसल्याच्या कारणातून विवाहितेचा छळ व जाचहाट करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासू, सासरे, दीर व जाऊ अशा चौघांवर फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उज्ज्वला अनिल येजगर असे आत्महत्या केलेल्या पीडित विवाहितेचे नाव आहे तर सासू गोदाबाई चंद्रकांत येजगर, सासरा चंद्रकांत सदाशिव येजगर, दीर योगेश चंद्रकांत येजगर आणि जाऊ अश्विनी योगेश येजगर (सर्व रा. सोनगाव, ता. फलटण) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी उज्वला यांचे बंधू लक्ष्मण शंकर भुसनर (वय 27, रा. हटकरवाडी, ता. शिरूर, जि. बीड) यांनी फिर्याद दिली आहे.

चार वर्षापूर्वी उज्वला आणि अनिल येजगर यांचे लग्न झाले होते. अनिल येजगर हे चालक असल्याने ते वारंवार घराच्या बाहेर असतात. याचाच फायदा घेवून गोदाबाई, चंद्रकांत, योगेश आणि अश्विनी हे उज्वलाचा लग्नात हुंडा दिला नाही व मानसन्मान दिला नाही यावरून मानसिक छळ करत होते. तसेच नवीन गाडी खरेदीसाठी आणि अश्विनीचे गहाण दागिने सोडवण्यासाठी माहेरहून 1 लाख रूपये आणण्याचा तगादा लावला होता. तसेच 1 लाख रूपये आणल्यानंतरच वडिलोपार्जित जमिनीमध्ये हिस्सा देणार असल्याचे संशयितांनी उज्वलाला सांगितले होते.

दि. 22 मे रोजी उज्ज्वलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे देविदास तुकाराम सदगर यांनी माहेरच्या नातेवाईकांना सांगितले. उज्वलाचा मानसिक छळ सुरू असल्यानेच आत्महत्या केली. तिच्या घरचे जबाबदार असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Back to top button