सातारा : वारकर्‍यांच्या आरोग्यासाठी ५२ वैद्यकीय पथके; पालखी मार्गावर तैनात | पुढारी

सातारा : वारकर्‍यांच्या आरोग्यासाठी ५२ वैद्यकीय पथके; पालखी मार्गावर तैनात

सातारा; पुढारी वृत्तसेवा : श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यासाठी सातारा जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. वारकर्‍यांच्या आरोग्य सेवेसाठी विविध पथके तैनात करण्यात आली आहेत. पालखी मार्गावर वैद्यकीय मदत पथके व फिरत्या पथकांसह एकूण 52 पथकांद्वारे वारकर्‍यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे.

श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा दि. 28 जून ते 4 जुलै असा जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार आहे. पालखीचा लोणंद, तरडगाव, फलटण विमानतळ, बरड या ठिकाणी एकूण सहा मुक्‍काम आहेत. कोरोनामुळे दोन वर्षे पायी वारीचा सोहळा झाला नव्हता. त्यामुळे यंदाच्या वर्षी जास्त वारकरी सहभागी होण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. आरोग्य विभागातर्फे आरोग्य सेवांसाठी वैद्यकीय अधिकारी, कर्मचार्‍यांवर जबाबदार्‍या निश्‍चित करण्यात आल्या आहेत. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून पालखी सोहळा पार पाडण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिल्या आहेत.

पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणार्‍या वारकर्‍यांना कोणत्याही साथीच्या आजारांचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपायांसाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. पालखी मार्गावरील पाण्याचे स्त्रोत व पाणी साठ्यातील पाणी नमुन्यांची अनुजैविक व रासायनिक तपासणी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी दिली.

पालखी सोहळ्यासाठी 79 वैद्यकीय अधिकारी, 202 आरोग्य सेवक पुरूष, 65 आरोग्य सेवक स्त्री, 3 आरोग्य पर्यवेक्षक, 84 आरोग्य सहाय्यक, 31 औषध निर्माण अधिकारी, 4 प्रयोगशाळा तंत्रज्ञ, 12 वाहन चालक, 54 शिपाई, 44 आरोग्यदूत असे मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे.
बीड, उस्मानाबाद, नांदेड या जिल्ह्यातून येणार्‍या भाविकांची संख्या विचारात घेवून डेंग्यु, चिकुनगुणिया या आजारांचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी विशेष खबरदारी घेवून पुरेसा औषधसाठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. वैद्यकीय अधिक्षक, औषध निर्माता, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, शिपाई वाहनचालक यांचे जिल्हास्तरीय वैद्यकीय पथक कार्यरत राहणार आहे.

हेल्थ वेलनेस सेंटरचे डॉक्टसर्र्

जिल्ह्यामध्ये महाबळेश्‍वर, वाई, खंडाळा, फलटण व माण या तालुक्यामध्ये हेल्थ वेलनेस सेंटर योजना राबवण्यात येत आहे. उपकेंद्रावर कार्यरत असलेले सुमारे 68 समुदाय आरोग्य अधिकारी पालखी सोहळ्यात सेवा देणार आहेत.

आरोग्य दूतामार्फत आरोग्य सेवा

पालखी सोहळ्यासाठी आरोग्य दूत ही नाविन्यपूर्ण संकल्पना राबवण्यात येणार आहे. यासाठी दुचाकी वाहनाचा वापर करण्यात येणार असून दोन आरोग्य कर्मचार्‍यांकडे मेडिसीन किट उपलब्ध आहे. ते वारकर्‍यांना भेटतील त्या ठिकाणी उपचार करणार आहेत. या आरोग्यदूतांसाठी विशिष्ट गणवेश व ओळखपत्र देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी दिली.

Back to top button