सातारा : टेंभूमुळे हजारो हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार | पुढारी

सातारा : टेंभूमुळे हजारो हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार

वरकुटे – मलवडी : पुढारी वृत्तसेवा :  माण-खटावच्या हजारो हेक्टर क्षेत्रात हरितक्रांती घडवण्यासाठी टेंभू योजनेतून अडीच टिएमसी पाणी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. अर्थसंकल्पीय वर्ष संपण्यापूर्वी हे पाणी माण-खटावच्या शिवारात फिरताना दिसेल तर उर्वरीत माणच्या सर्व गावांनाही पाणी देण्यासाठी सर्वेक्षणाचे काम जलद गतीने सुरु आहे. फक्‍त राष्ट्रवादी पक्षच माण- खटावचे प्रश्‍न मार्गी लावत असून येथील प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रभाकर देशमुख हे सतत मंत्रायलयात हेलपाटे मारताना दिसतात. त्यामुळे यापुढे देशमुख सांगतील ते प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील, अशी स्पष्टोक्‍ती उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी दिली.

टेंभू योजनेतून माण – खटावमधील 57 गावांचा समावेश केल्याबद्दल वरकुटे-मलवडी येथे राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने आयोजित केलेल्या कृतज्ञता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जलसंपदामंत्री ना. जयंत पाटील, सहकार व पणन मंत्री ना. बाळासाहेब पाटील, खा. श्रीनिवास पाटील, आ. मकरंद पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. दिपक चव्हाण, प्रभाकर देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने, सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, प्रा. कविता म्हेत्रे, सुभाष शिंदे, संदीप मांडवे, अभय जगताप, अनुराधा देशमुख, नंदकुमार मोरे, वडूज नगराध्यक्षा मनिषा काळे, दहिवडी नगराध्यक्ष सागर पोळ, बाळासाहेब सावंत, सरपंच बाळासाहेब जगताप उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, माण-खटावमध्ये आमच्या विचाराचा लोकप्रतिनिधी नाही तरीही येथील जनता आमची आहे.

या जनतेची गेली अनेक वर्षांची पाण्याची मागणी प्राधान्याने सोडवण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने हाती घेतले आहे. यासाठी या तालुक्यांना वरदान ठरणार्‍या टेंभू योजनेचा अतिरिक्‍त पाण्याचा कोटा वाढवून ते वाढीव अडीच टिएमसी पाणी या तालुक्याला देण्याचा धाडसी निर्णय आम्ही घेतला आहे. यामुळे सध्या या दोन्ही तालुक्यातील 57 गावांना लाभ होणार असला तरी उर्वरीत गावांनाही याचा लाभ कसा देता येईल यासाठी सर्व्हेक्षणाचे काम जलद गतीने सुरु आहे. त्यासाठी जलसंपदा खात्याला लागेल तेवढा निधी उपलब्ध करुन देवू. टेंभू योजनेबरोबरच उरमोडी, जिहे-कठापूर या योजनांचा लाभही माण-खटावच्या जनतेला देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्या योजनानांही निधी उपलब्ध करुन दिला आहे. म्हसवड शहराच्या सुधारित पाणी योजनेसाठीही 86 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

राष्ट्रवादी पक्ष हा शब्द देणारा पक्ष नसून तो वचनपूर्ती करणारा पक्ष आहे. येथील लोकप्रतिनिधी आमच्या विचाराचा नसला तरी येथील लोकं आमच्या विचाराचे आहेत. कोण काय म्हणतंय, कोण काय करतंय याकडे मी लक्ष देत नाही तर आम्हाला सामान्य जनतेसाठी काय करता येईल याचा आम्ही सतत विचार करत असतो.

माण – खटावच्या जनतेचे प्रश्‍न सोडवण्यासाठी येथील राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख हे नेहमीच आग्रही राहिले आहेत. त्यांनी यापुढे सर्वांना सोबत घेवून एकत्रीत काम करावे व येथील सर्व कार्यकर्त्यांनीही देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काम करताना येथील प्रश्न मार्गी लावावेत, असे आवाहनही ना. पवार यांनी केले.

ना. जयंत पाटील म्हणाले, दुष्काळी माण-खटाव भागातील जनतेने व नेत्यांनी या भागाला पाणी कधीच मिळणार नाही, अशी मानसिकता आजवर करुन घेतली होती. पण खा. शरद पवार यांनी दुष्काळी जनतेला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी जलसंपदा विभागाने टेंभूचे पाणी आरक्षित केले आहे. तसेच जिहे-कठापूर व उरमोडीच्या उर्वरित कामांसाठी वित्तविभागाने मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे येत्या काळात या सर्व योजना पूर्णत्वास जावून जिथे कुसळे उगवत होती तिथे बागायत शेती होणार आहे.

प्रभाकर देशमुख म्हणाले, माण व खटाव मधील सर्वात उंचीवरील गावांना पाणी देण्याचा धाडसी निर्णय राष्ट्रवादी पक्षाने घेत टेंभू योजनेचे अडीच टिएमसी पाणी आरक्षित केले आहे. तर दुष्काळी माणच्या भुमीत पाणी आडवा, पाणी जिरवा ही संकल्पना घेवून आपण गावोगावी फिरुन पाणी फौंडेशनच्या माध्यमातून एक चळवळ उभी केली. त्यासाठी हजारो लोकांनी श्रमदान केले तर नोकरवर्गाने आर्थिक मदत केली. यामुळे मोठे काम उभे करता आले. या कामासाठी ज्यावेळी निधीची गरज निर्माण झाली त्यावेळी पवारसाहेबांनी पुढे होवून यासाठी साडे सहा हजार कोटी रुपये उपलब्ध करुन दिले. त्यामुळेच आज माण -खटाव मधील शेकडो गावे ही टँकरमुक्‍त झाली आहेत. टेंभू योजनेतून खटाव तालुक्यातील डांबेवाडी ते कलेढोण तर माण मधील किरकसाल ते कुकुडवाड या परिसरातील 57 गावांचा यामध्ये समावेश करण्यात आला असून यामध्ये माणमधील 30 गावे तर खटावमधील 27 गावांना याचा लाभ मिळणार आहे. लवकरच उर्वरीत गावांनाही पाण्याचा लाभ दिला जाणार आहे. यावेळी पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील व खासदार श्रीनिवास पाटील यांनी मनोगत व्यक्‍त केले.

मी तुमच्या ओळखीचा वाढपी…
माझ्याकडे राज्याचे अर्थ खाते असल्याने मी वाढप्याच्या भूमिकेत आहे. पंगतीला जेवन करताना वाढपी ओळखीचा असला तर जेवन जास्त मिळते तसा मी तुमच्या ओळखीचा वाढपी असल्याने माण-खटावला जास्त निधी देवून येथील कोणत्याही विकासकामांना निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी दिली.

Back to top button