कराड : तांबवे ग्रामपंचायतीत विधवा प्रथाबंदीचा ठराव | पुढारी

कराड : तांबवे ग्रामपंचायतीत विधवा प्रथाबंदीचा ठराव

कराड : पुढारी वृत्तसेवा

हेरवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंदीचा घेतलेला ठराव तांबवे ता. कराड ग्रामपंचायतीने अभिनंदनाचा ठराव केला. त्याचबरोबर ऐतिहासिक पाऊल उचलत सातारा जिल्ह्यामध्ये प्रथमच हेरवाड ग्रामपंचायतीचा आदर्श घेऊन विधवा प्रथेच्या बंदीचा ठराव केला.

तांबवे ग्रामपंचायतीची मासिक सभा 20 मे रोजी ग्रामपंचायत सभागृहात भरली होती. यावेळी हेरवाड, ता. शिरोळ ग्रामपंचायतीने घेतलेल्या निर्णयाबद्दल तसेच राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने आधुनिकतेला वाव देत विधवा प्रथेला बंदी घातली. याबद्दल ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजयसिंह पाटील यांनी ठराव मांडला व त्याला ग्रामपंचायत सदस्या सौ.जयश्री कबाडे यांनी अनुमोदन दिले. सर्वसंमतीने हेरवाड ग्रामपंचायतीच्या अभिनंदनाचा व तांबवे गावामध्ये विधवा प्रथा बंदीचा ठराव मंजूर करण्यात आला. तांबवे गावाला स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर अध्यात्माचा वारसाही गावाने जपला आहे. त्यामुळे गावामध्ये कर्मकांडाला जास्त महत्व न देता आधुनिकतेची कास धरली जाते.

उपसरपंच विजयसिंह पाटील म्हणाले, तांबवे ग्रामपंचायतीने हेरवाड ग्रामपंचायतीचा आदर्श घेऊन सातारा जिल्ह्यामध्ये प्रथमच विधवा प्रथा बंदीचा ठराव मंजूर केला आहे. यासाठी आम्ही जनजागृती करणार असून 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीदिनी गाावातील विधवा भगिनींना एकत्रित बोलावून त्यांना सुवासिनींचे अलंकार घालण्यासाठी प्रवृत्त करणार आहोत.

स्व.सौ.सुशिला ज्ञानदेव पाटील ट्रस्टच्या उपाध्यक्षा सौ.सविता पाटील म्हणाल्या, पतीच्या निधनावेळी, अंत्यविधीवेळी पत्नीच्या कपाळावरील कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायांतील जोडवी काढणे यामुळे महिलांच्या अधिकारावरती गदा येते. परंतु ग्रामपंचायतीने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे विधवा महिलांना समाजात सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार मिळणार आहे. याबद्दल ग्रामपंचायतीचे अभिनंदन. यावेळी सरपंच शोभाताई शिंदे, माजी उपसरपंच धनंजय ताटे, माजी सरपंच विठोबा पाटील, ग्रामपंचायत सदस्य स्वाती काटवटे, रेश्मा वाडते, नीता पवार, देवानंद राऊत, उत्तम साठे, अमर गुरव, सिंधुताई पाटील, सुवर्णा कुंभार, ग्रामसेवक टी.एल. चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तांबवे ग्रामपंचायत नेहमीच सामाजिक प्रबोधनात्मक उपक्रम राबवत असते. कोरोना काळात 2 एप्रिल 2020 रोजी ग्रामीण भागामध्ये जिल्ह्यातील पहिला कोरोनाबाधित तांबवे गावामध्ये आढळला. त्यावेळी कोरोनाबद्दल कोणालाही माहिती नसल्याने भितीचे वातावरण तयार झाले होते. तत्कालीन सरपंच जावेद मुल्ला व जि.प. सदस्य प्रदीप पाटील यांनी सर्वांच्या सहकार्याने प्रशासनाच्या सूचना, ग्रामस्थांची एकजूट व स्वाध्याय परिवाराची स्वयंशिस्त यामुळे कोरोनाची साखळी तोडली होती. गेल्यावर्षी जि.प . शाळेमध्ये मुलींच्या आगमनावेळी केवळ गुलाबपुष्प न देता ग्रामपंचायतीने सुकन्या समृद्धी योजनेतून मुलींच्या नावे बँकेमध्ये खाते काढून त्यात रक्कम जमा केली होती. नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात तांबवे ग्रामपंचायत कायमच अग्रेसर असते.

विधवा भगिनींसाठी ग्रामपंचायतीने घेतलेला हा निर्णय खूप मोठा आहे. विधवांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन वेगळा असतो. मात्र या निर्णयाने विधवा महिलांनाही समाजात सर्वांप्रमाणेच समान सन्मानाची वागणूक मिळेल. पतीच्या निधानंतरचे आयुष्य या निर्णयामुळे आणखी सुखकर होण्यास मदत होईल.
– श्रीमती इंदुताई प. पाटील

Back to top button