सातारा : टंचाईच्या वाढल्या झळा; टँकर सुरू | पुढारी

सातारा : टंचाईच्या वाढल्या झळा; टँकर सुरू

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात उन्हाची तीव्रता प्रचंड प्रमाणात वाढली असून त्यामुळे ग्रामीण भागात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. टंचाईच्या झळा वाढल्याने जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील सहा गावे व पाच वाड्यांवर सात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. 6 हजार 908 लोकसंख्येला आणि 1 हजार 869 पशुधनाला टँकरने पाणी पुरवले जात आहे.

यंदा उन्हाचा चटका वाढत आहे. तुलनेने यावर्षी टंचाईग्रस्त गावांची संख्या कमी राहिली आहे. मात्र, आता टंचाईची दाहकता वाढत चालल्याचे चित्र आहे. आगामी दोन आठवड्यात टँकरची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असून सुमारे 50 गावांत पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्याचे सांगितले जात असले तरी बहुतांशी विहिरींची पाणीपातळी खालावली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य सध्या पाहायला मिळत आहे.

दिवसेंदिवस उन्हाच्या झळा वाढू लागल्या असून माण, खटाव या दुष्काळी तालुक्यांसह कराड, वाई व सातारा तालुक्यांतील दुर्गम डोंगराळ भागात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. सध्या जिल्ह्यात सहा गावे व पाच वाड्यांवर पाणीटंचाई जाणवत आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने सात टँकरव्दारे या गावे व वाड्यांना 14 खेपांव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या सात टँकर सुरू असून यामध्ये वाई- दोन, सातारा- दोन, कर्‍हाड- दोन, माण- एक याप्रमाणे टँकर सुरू आहेत. टंचाईच्या झळा कमी करण्यासाठी खटावमधील दोन विहिरी व तीन बोअरवेल, वाईत दोन विहिरी, सातार्‍यात एक विहिर, कराड तालुक्यात एक विहिर आणि फलटण तालुक्यात दोन बोअरवेल अधिग्रहीत केल्या आहेत.

सातारा, कराड, माण, फलटणमध्ये टँकर

सहा गावे व पाच वाड्यांवरील सहा हजार 908 लोकसंख्या बाधित असून एक हजार 869 पशुधनाला टँकरने पाणी पुरवले जात आहे. वाई तालुक्यातील मांढरदेव, गडगेवाडी, सातारा तालुक्यातील जांभ, आवाडवाडी, निकमवाडी, कराड तालुक्यातील वानरवाडी, वामनवाडी, माण तालुक्यातील पाचवड गावठाण शिंगाडेवस्ती, गेंदवाडा, फलटण तालुक्यातील जिंती या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

Back to top button