सातारा : आबा, काकांनी दंड थोपटले; मदनदादाही मैदानात | पुढारी

सातारा : आबा, काकांनी दंड थोपटले; मदनदादाही मैदानात

वाई (सातारा) : पुढारी वृत्तसेवा
पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असणार्‍या किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल 223 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे एकूण विक्रमी 347 अर्ज दाखल झाले आहेत. अखेरच्या दिवशी आ. मकरंद पाटील व त्यांचे बंधू जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीनकाका पाटील, मदनदादा भोसले यांनीही स्वत:चा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आ. महेश शिंदे यांच्या समर्थकांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले. मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाल्यामुळे ‘किसनवीर’चा फड चांगलाच गाजणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

दरम्यान, मकरंदआबांनी सोसायटी गटातून, नितीनकाकांनी कवठे गटातून तर मदनदादा भोसले यांनी भुईंज गटातून अर्ज दाखल केले आहेत. यानिमित्त दोन वर्षानंतर पुन्हा एकदा भोसले विरूध्द पाटील असा संघर्ष पहायला मिळणार आहे. वाई, खंडाळा, जावली, सातारा, कोरेगाव अशा पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या 21 जागांसाठी 3 मे रोजी मतदान होत आहे. त्यासाठी दि. 28 मार्च रोजी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली. गुरूवारपर्यंत 124 जणांनी आपले अर्ज दाखल केले होते. शुक्रवार अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने अर्ज दाखल करण्यासाठी वाईच्या प्रशासकीय कार्यालय परिसरात उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तोबा गर्दी केली होती.

शुक्रवारी सकाळी 11 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली. त्यानंतर दुपारी 1 च्या दरम्यान आ. मकरंद पाटील यांनी सोसायटी गटातून, नितीनकाका पाटील यांनी कवठे गटातून अर्ज दाखल केले. तर दुपारी 2 च्या सुमारास मदनदादा भोसले यांनी भुईंज गटातून अर्ज दाखल केला. यावेळी बहुतांश विद्यमान संचालक व इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले तर आ. महेश शिंदे यांच्यामार्फत समर्थकांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले.
‘किसनवीर’वर कोट्यवधींचे कर्ज असल्याने गतवेळी मकरंद पाटील यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, शेतकरी, कामगार व कारखाना वाचण्यासाठी आ. मकरंद आबा यंदा तरी ‘किसनवीर’ लढणार का? असा रोकठोक सवाल करत दै. ‘पुढारी’ने आपली भूमिका मांडली. याचा विचार करून आ. मकरंद पाटील यांनी किसनवीर निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच यंदा विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत.

भोसले विरुद्ध पाटील यांच्यातील राजकीय वैर अनेक दशकांपासून सुरु आहे. निवडणूक कोणतीही असो यांच्यातील संघर्ष शिगेला पोहचतो. 10 वर्षानंतर पुन्हा एकदा कृष्णाकाठी सत्तासंघर्ष पहायला मिळणार आहे. अडीच वर्षापूर्वी विधानसभेच्या निमित्ताने भोसले विरुद्ध पाटील यांच्यातील संघर्ष मतदार संघातील जनतेने अनुभवला होता. ‘किसनवीर’ चा अखाडा मात्र तब्बल 10 वर्षानंतर पुन्हा एकदा गाजणार आहे. तो दादा विरुद्ध आबा, काका यांच्यातील कलगीतुर्‍याने, आरोप -प्रत्यारोपाच्या फैरीनी, शिवाय शेलक्या शब्दांनी एकमेकांवर हल्ले चढवले जातील.
कोट्यावधीचे कर्ज, चालू गळीत हंगाम सुरु करण्यास आलेले अपयश, कामगारचे थकित पगार, मागील देणी, ठेवी या सर्व मुद्द्यांवर ही निवडणुक गाजणार आहे. जसा खंडाळा कारखाना जिंकला तसाच किसनवीर कारखानाही मोठया मताधिक्क्याने ताब्यात घेवू, असा विश्‍वास मकरंद आबा व नितीनकाकांनी व्यक्‍त केला आहे.

किसनवीरचा लिलाव होऊ देणार नाही. तो शेतकर्‍यांच्या मालकीचा रहावा, यासाठी प्रसंगी संघर्ष करण्याची भूमिका आम्ही घेतली असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले. तर किसनवीर राजकरणाचा बळी कसा पडला. यामागचे सूत्रधार कोण? यांचा पर्दाफाश करणार आहे. ‘किसनवीर’चा जरंडेश्‍वर होऊ देणार नाही, असा इशारा मदनदादांनी दिला आहे. शुक्रवारी भुईंज गटातून 58, वाई- बावधान-जावलीमधून 30, खंडाळा- कवठे गटातून 49, सातारा गटातून 57, कोरेगाव गटातून 70 तसेच अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ 18 महिला राखीव 21, इतर मागास प्रवर्ग 16, विशेष मगास प्रवर्ग 13, उत्पादक संस्था., बिगर उत्पादक संस्था व पणन संस्थामधून एकूण 6 अर्ज दाखल आहेत. 21 जागांसाठी विक्रमी 347 इतके अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जांची छानणी सोमवार, द. 4 एप्रिल रोजी होेणार आहे.

या मातब्बरांनी केली आपली दावेदारी

आ. मकरंद पाटील व नितीन पाटील यांच्या गटातून शशिकांत पिसाळ, दिलीपबाबा पिसाळ, मदनआप्पा भोसले, महादेव मस्कर, प्रतापराव पवार यांनी अर्ज दाखल केले. तर कारखान्याचे माजी चेअरमन मदन भोसले यांच्या गटातून सीए चंद्रकांत काळे, प्रताप यादव, दीपक ननावरे, रतनसिंह शिंदे, अल्पनाताई यादव, सतीश भोसले यांच्यासह अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

Back to top button